प्रश्न पडणे प्रगतीचे लक्षण आहे. मराठी माणसाला मात्र प्रश्न पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.
त्रिवेणीनगर येथील नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार डॉ. देखणे यांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, अभिनेते विजय कदम, विजय पटवर्धन, नगरसेवक बाबासाहेब धुमाळ, संस्थेचे अध्यक्ष महेश स्वामी आदी उपस्थित होते. आत्माराम जाधव, श्रीहरी डांगे, सुनील भटेवरा, पांडुरंग पाटील, संदीप जाधव, उदय कवी, मधुसूदन ओझा, स्मिता हरकळ यांना आदर्श कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
डॉ. देखणे म्हणाले, ज्याला प्रश्न पडत नाही, तो माणूस जगण्याच्या पात्रतेचा आहे की नाही, असा प्रश्न पडतो. प्रश्न पडला नसता तर भगवद्गीतेची निर्मिती झाली नसती. जीवनात वास्तवाला सौंदर्याची जोड देणाऱ्यांचा गौरव होतो. बारणे म्हणाले, सत्कर्म करणाऱ्यांचा सत्कार होतो. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमुळे त्या पुरस्कारांची उंची वाढते. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. माणुसकीच्या भावनेतून शेतकरी बांधवांना मदत करावी. विजय कदम यांनी फटाक्यांवर उधळपट्टी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक महेश स्वामी यांनी केले तर, डॉ. विवेक मुथ्था यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms progress buffet questions marathi man