राज्यातील राज्य पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आता टॅब्लेट पीसी देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या अनुषंगाने अवघ्या एका महिन्यामध्ये टॅब्लेट खरेदीची निविदा प्रक्रिया होऊन टॅब्लेटचे वाटपही करण्यात आले आहे.
शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी आणि राज्यातील शिक्षकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना लॅपटॉप किंवा टॅब्लेट पीसी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. ५ सप्टेंबरला झालेल्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया देऊन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना टॅब्लेट पीसी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याप्रमाणे शिक्षकांना टॅब्लेटचे वाटपही करण्यात आले आहे.
या वर्षी राज्यात १०५ शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. या सर्व शिक्षकांना टॅब्लेट देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेतून मुंबईच्या डेटामीनी टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीकडून ८ हजार ८०० रुपये एक टॅब्लेट पीसी या दराने खरेदी करण्यात आली होती.