चार दिवसांतच डेक्कन क्वीनच्या नव्या डब्याची दुरवस्था; शौचालयातील साहित्य कोसळले

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनच्या नव्या एलबीएच डब्याची अवघ्या चार दिवसांतच दुरवस्था झाली आहे.

deccan
संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनच्या नव्या एलबीएच डब्याची अवघ्या चार दिवसांतच दुरवस्था झाली आहे. शौचालयातील साहित्य कोसळल्यामुळे या नव्या डब्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकाराबाबत प्रवासी तसेच रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

डेक्कन क्वीनमधील वातानुकूलित सी टू या पासधारकांच्या डब्यामध्ये शौचालयातील बहुतांश साहित्य कोसळले. विजेच्या ताराही खाली कोसळल्या आहेत. हा प्रकार गाडी पुण्याहून मुंबईकडे जात असताना घडला. हा प्रकार घडला तेव्हा शौचालयात प्रवासी नव्हता. अन्यथा प्रवासी जखमी झाला असता. चारच दिवसांपूर्वी या गाडीला नवीन डबे बसविण्यात आले आहेत. नवीन डब्यातील साहित्य कोसळून पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

चारच दिवसांपूर्वी म्हणजे २२ जून रोजी सायंकाळी मुंबईहून गाडी पुण्याकडे येताना जुने डबे बदलून नवे डबे बसविण्यात आले होते.  हे नवीन डबे चेन्नई येथील कंपनीत तयार करण्यात आले आहेत. या डब्याची चाचणी करून ते चालविण्यास योग्य असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर डबे पुण्यात आले आणि पुण्यातून मुंबईला गेले. मुंबईत डब्याची पुन्हा एकदा तपासणी करून ते चालविण्यास योग्य असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नव्या एलबीएच डब्याला चार दिवस झाले असताना शौचालयातील साहित्य कोसळल्याने या डब्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

चार दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनला नवीन डबे बसविण्यात आले असताना सी टू डब्यामधील शौचालयातील साहित्य कोसळले कसे? त्यामुळे रेल्वे प्रशासन खरेच डब्याची तपासणी करते का? असा प्रश्न उपस्थित होतो. सुदैवाने शौचालयात कोणी नव्हते. अन्यथा प्रवासी जखमी झाला असता. 

– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The condition deccan queen new coach within four days material collapsed ysh

Next Story
कडधान्य पिकांच्या पेरण्या अडचणीत; पेरणी सरासरीच्या फक्त बारा टक्क्यांवर; खरिपातील उत्पादनावर परिणाम शक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी