सिद्धार्थ केळकर
पुणेकरांचे दैनंदिन जीवन अलीकडे दुष्कर होते आहे, हे खरेच! वाहतूककोंडी, खड्डे, अतिक्रमणामुळे चालायला जागाच न उरणारे पदपथ, किरकोळ कारणांवरून हाणामाऱ्या आणि एकूणच गुन्हेगारीत झालेली वाढ यामुळे पुणेकर त्रस्त आहेत. ‘पुणे असे नव्हते,’ असे म्हणणारे केवळ हताशपणे हळहळण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत, अशी सध्याची अवस्था. अशा सगळ्या मळभ दाटलेल्या वातावरणात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटना सोनेरी उन्हासारख्या वाटल्या. निराशेच्या वातावरणात अशी ऊब आवश्यक असते, म्हणून त्यांचा उल्लेख आवश्यक.
पहिली घटना कात्रज परिसरातील. एका इमारतीतील सदनिकेच्या खिडकीत एक बालिका खिडकीच्या जाळीला धरून लटकत असल्याचे समोरच्या इमारतीतील एकाने पाहिले. प्रसंग गंभीर होता. हे दृश्य पाहणारे उमेश सुतार यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या, अग्निशामक दलाचे जवान योगेश चव्हाण यांना त्याबद्दल सांगितले. चव्हाण यांनीही ते दृश्य बघताच अजिबात विलंब न लावता, प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिकडे धाव घेतली. तोवर, घराला कुलूप लावून बाहेर गेलेली बालिकेची आई परतल्याने पटकन् कुलूप उघडून त्यांना आत जाता आले. खिडकीकडे धाव घेऊन त्यांनी त्या बालिकेला अलगद उचलून आत घेतले. हे प्रसंगावधान दाखवले गेले नसते, तर गंभीर घटना घडू शकली असती.
त्या दिवशी साप्ताहिक सुटीवर असलेल्या चव्हाण यांनी कर्तव्य पार पाडले, ते माणुसकीच्या नात्याने! एरवी रस्त्यावर अपघात झाला, तर मदतीसाठी न थांबता पुढे निघालेले, आपण कशाला त्यात पडायचे, अशी वृत्ती बळावलेले शहरवासीय दिसत असताना, अशा घटना माणुसकीची बेटे अजून शिल्लक आहेत, याची जाणीव करून देणाऱ्या आणि म्हणूनच दिलासादायक! दुसरा प्रसंग परवाचा; गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थिनी आणि निवृत्त शिक्षिका माणिक फुलंब्रीकर यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी संस्थेला सुपूर्द करण्याचा. ज्या संस्थेत आपण घडलो आणि ज्या संस्थेने आपल्याला शिक्षक म्हणून काम करण्याचीही संधी दिली, त्या संस्थेसाठी आपण काही तरी द्यावे, या निर्मळ भावनेतून त्यांनी दिलेली ही देणगी किती तरी मोलाची. एक कोटी ही छोटी रक्कम नाही.
एखाद्या उद्योजकाने वा धनाढ्याने ती दिली असती, तर एक वेळ ठीक! पण, एका मध्यमवर्गीय व्यक्तीने स्वकमाईचा एवढा मोठा वाटा संस्थेप्रति कृतज्ञता म्हणून देणगी स्वरूपात देणे खचितच दुर्मीळ. आणि म्हणूनच अधिक मौल्यवान! मध्यमवर्गीय माणूस पुढच्या पिढीसाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी नियोजन करत असतो. अनेकदा तर त्यावरून नंतर कुटुंबांतर्गत कलह होतानाही आपण बघतो. अशा वेळी निरलसपणे एवढी मोठी स्वकमाई, ज्या संस्थेने आपल्याला ओळख दिली, तिच्यासाठी दान देणे हे आदर्शच ठरते.
या दोन घटनांचा आवर्जून उल्लेख एवढ्याचसाठी, की ज्या सामान्य माणसाला व्यवस्था कायम गृहीत धरते आणि अनेकदा नाडतेच, तोच सामान्य माणूस शेवटी चांगुलपणाचा समतोल बिघडू नये, याची काळजी घेण्यासाठी पुढे येत असतो. या दोन उदाहरणांसारखीच इतरही अनेक उदाहरणे समाजात आहेत. सीमेवरच्या जवानांना आवर्जून राख्या, तिळगूळ पाठवणाऱ्यांपासून चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना दर वर्षी देणगी देणारे अनेक हात आहेत. पुण्यासारख्या शहरात तर अशा ‘कार्य’कर्त्यांचे जाळे खूप मोठे.
गणेशोत्सव हा तर असे ‘कार्य’कर्ते घडविणारा उत्सव. हे सगळे जे होते, ते समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून. यात सामान्य माणसाला ना मोठेपण मिळविण्याची आस असते, ना प्रसिद्धीचा सोस. अनेकदा तर असे ‘कार्य’कर्ते अनाम राहतात, पण म्हणून माणूसपण जपण्याचे सोडत नाहीत. जपलेल्या याच माणूसपणामुळे समाजाची वीण उसवण्यापासून वाचत असते. म्हणूनच ती टिकवणाऱ्यांना आपण मनापासून सलाम करायचा.