पोलीस व माध्यमे हे दोन्ही घटक समाजहितासाठी काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यात समन्वय असावा, तसेच परस्परांमध्ये विश्वासार्हता असावी, असे मत पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड क्राईम असोसिएशन व पोलीस आयुक्तालयाचे ‘परिमंडल ३’ यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डीतील फोर्स मोटर्सच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. उद्घाटन पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी शेलार, स्मिता पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस व माध्यम प्रतिनिधींनी एकमेकांविषयी आलेले अनुभव विशद केले.
उमाप म्हणाले, माध्यमे व पोलिसांमध्ये समन्वय असावा, त्यांच्यात दरी निर्माण होऊ नये म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांकडून माहिती दडवण्याचे कारण नसते. मात्र, काही मर्यादा पाळाव्या लागतात. त्यातून माहिती देण्यास उशीर होतो व दोहोंमध्ये बेबनाव होऊ शकतो. मात्र, परस्परांच्या कामाची माहिती असल्यास तसे होणार नाही. एकमेकांविषयी आदर ठेवल्यास वाद होणार नाहीत. एखाद्या घटनेत शब्दाने शब्द वाढतो आणि संबंध बिघडतात, असे प्रकार टाळणे शक्य असते. दोघांनी समन्वयाने काम केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य होतील, असे ते म्हणाले. गणवेषात असल्यानंतर पोलिसांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संयोजन पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील तसेच रोहित आठवले, अमोल ऐलमार, गोविंद वाकडे आदींनी केले. स्मिता पाटील यांनी आभार मानले.