पूजेसाठी नोट मागण्याचा बहाणा करणाऱ्या चोरटय़ाने डहाणूकर कॉलनीतील महावितरणच्या वीज बिल भरणा कें द्रातील महिलेला बोलण्यात गुंतवून ६८ हजार रु पये लंपास केल्याची घटना ७ जानेवारीला घडली. नोटाबंदीनंतर सक्रिय झालेल्या चोरटय़ाने शहरात बतावणी करून आतापर्यंत सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
वीज बिल भरणा केंद्रातील कर्मचारी ज्योती कुचेकर (वय २२) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक तेरा येथे महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीज बिल भरणा केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरटा तेथे आला. त्याने हेल्मेट परिधान केले होते. माझ्याकडे शंभर रु पयांच्या वीस नोटा आहे. त्याबदल्यात दोन हजारांची नोट पूजेसाठी हवी आहे. पूजेसाठी नोटेवर अकरा क्रमांक असला पाहिजे, अशी बतावणी त्याने वीज बिल भरणा केंद्रातील कर्मचारी कुचेकर यांच्याकडे केली. त्यानंतर कुचेकर यांनी जमा झालेल्या नोटा पाहिल्या आणि अकरा क्रमांकाची नोट नसल्याचे त्याला सांगितले.
कुचेकर यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडे नोटांचा बंडल पाहण्यास मागितला. त्याने दोन हजारांच्या ३४ नोटा बंडलमधून काढून घेतल्या. बंडलमध्ये शंभर रुपयांच्या वीस नोटा त्याने ठेवल्या. तेथून चोरटा पसार झाला. काही वेळानंतर कुचेकर यांनी बंडलची पाहणी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. बोबडे तपास करत आहेत. नोटाबंदीनंतर पूजेसाठी दोन हजारांची नोट हवी असल्याची बतावणी करणाऱ्या चोरटय़ाने सात गुन्हे केले आहेत. लष्कर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका पतसंस्थेतील महिला कर्मचाऱ्याकडे त्याने बतावणी करून रोकड लंपास केली होती. तुळशीबागेतील एका दुकानात शिरून तेथील कर्मचाऱ्याची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र,अद्याप पोलिसांना चोरटय़ााला पकडता आले नाही.