पणजी शहरात ज्या प्रमाणे ओला कचरा जेथे निर्माण होतो, तेथेच जिरवला जातो, तशा प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी पुण्यातही करावी लागेल. पुण्यातील कचरा प्रक्रियेची चर्चा देशभरात आहे आणि पुणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ शहर होण्यासाठी आता पुण्यातही विविध उपाययोजना कराव्या लागतील, असे प्रतिपादन आयुक्त महेश पाठक यांनी सोमवारी केले.
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापालिकेतर्फे पुणे शहर स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ प्रभाग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी करण्यात आले. या वेळी आयुक्त बोलत होते. महापौर वैशाली बनकर, खासदार वंदना चव्हाण, उपमहापौर दीपक मानकर, सभागृहनेता सुभाष जगताप, मनसेचे गटनेता वसंत मोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्रभाग क्रमांक २१ ला (कोरेगाव पार्क) देण्यात आले. बाबू वागसकर आणि वनीता वागसकर हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. द्वितीय पारितोषिक संगीता देशपांडे आणि योगेश मोकाटे यांच्या प्रभाग क्रमांक ३३ ला (कोथरूड) देण्यात आले, तर मीनल सरवदे आणि बापूराव कर्णे गुरुजी यांच्या प्रभाग क्रमांक १७ ला (नगर रस्ता) स्पर्धेतील तृतीय पारितोषिक देण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी मनीषा घाटे आणि धनंजय जाधव यांच्या प्रभाग क्रमांक ५१ ची (लोकमान्यनगर) निवड करण्यात आली आहे.
पुणे महापालिका कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी जे प्रकल्प राबवत आहे, त्याची चर्चा देशभरात आहे. देशातील अनेक राज्यांचे, महापालिकांचे प्रतिनिधी सातत्याने पुण्याला भेटी देत आहेत. यापुढे जाऊन आता पणजी शहरात ज्या पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्याप्रमाणेच पुण्यातही योजना राबवावी लागेल. पणजीमध्ये ओला कचरा जेथे जेथे निर्माण होतो तेथेच तो जिरवला जातो. प्रशासनातर्फे गोळा करण्याची व्यवस्था तेथे नाही. तसेच ज्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकत नाही, असा कचराही स्वीकारला जात नाही. तेथील शासनाने प्रक्रिया न होऊ शकणारा सुका कचरा पणजीत येणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
स्वच्छतेच्या कामासाठी लोकांचा सहभाग असणे ही सर्वात मुख्य गोष्ट आहे. तसा सहभाग मिळाल्यामुळेच या स्पधेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवता आले, असे नगरसेविका वनीता वागसकर यांनी सांगितले. कचरा प्रक्रियेसाठी, स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली.
 शहराची स्वच्छता जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच सौंदर्यही महत्त्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांसह त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घ्यावा आणि हा उपक्रम पुढेही सुरू ठेवावा, अशी सूचना खासदार चव्हाण यांनी या वेळी केली.