पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठीची मुदत मंगळवारी संपली. दुसऱ्या फेरीत जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू करण्यात येणार असून, तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी २२ ऑगस्टला जाहीर करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर दुसऱ्या फेरीत १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार बुधवार सायंकाळपर्यंत केंद्रीय प्रवेशांद्वारे एकूण ३३ हजार २६०, तर राखीव जागांसह एकूण ४० हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १८ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तसेच १८ आणि १९ ऑगस्ट या कालावधीत नवीन अर्ज नोंदणीसह प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. २२ ऑगस्टला तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्यात येतील. या कालावधीत राखीव जागांवरील (कोटा) प्रवेश प्रक्रिया, द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. २४ ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यातील जागा प्रत्यार्पित करता येतील. तर २५ ऑगस्टपासून पुढील फेरीची प्रक्रिया राबवण्यात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third round of eleventh online admissions from 17 august pune print news zws
First published on: 17-08-2022 at 20:22 IST