एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीला मारहाण करून पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी पकडले. त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सेनापती बापट रस्त्यावर गुरुवारी (६ ऑक्टोबर) ही घटना घडली होती.
सागर कुमार अलकुंटे (वय २६, रा. शंकर मठ, हडपसर), सौरभ किरण जगताप (वय २२, रा. गोखलेनगर) आणि टिनू मॅथ्यू (वय २०, काळेबोराटेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात एका वीस वर्षीय तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी अलकुंटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विनयभंग तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
तक्रारदार तरुणी सिम्बायोसिस महााविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी सागरने काही दिवसांपूर्वी तरुणीशी ओळख केली आणि तो सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेत असल्याची बतावणी तरुणीकडे केली होती. त्यानंतर तरुणीने शहानिशा केली. तेव्हा तो महाविद्यालयात शिक्षण घेत नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे सागर तिच्यावर चिडला होता. त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करून तिला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. गुरुवारी दुपारी तरुणी आणि तिच्या मैत्रिणी सेनापती बापट रस्त्यावरून निघाल्या होत्या. त्या वेळी सागर, त्याचे मित्र सौरभ, टिनू आणि साथीदार तेथे आले. त्यांनी तरुणीला अडविले. त्यांनी भररस्त्यात तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींना मारहाण केली. मारहाण करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी डेक्कन पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी डेक्कन, अलंकार, कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी लगोलग मध्यरात्री तिघा आरोपींना पकडले.
विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न
दरम्यान, तक्रारदार तरुणीने पोलिसांकडे आणखी एक तक्रार दिली. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी सागर अलकुंटे माझ्या मागावर होता. त्याने विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपींना सेनापती बापट रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. तिला सहा ते सात आरोपींनी मारहाण केल्याचे चित्रीकरणातून उघड झाले आहे.