एकीकडे पाच दिवसांच्या गौरी-गणपतीला वाजत गाजत निरोप देण्याचा उत्साह
डेक्कनवरील गरवारे चौक, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, घोले रस्ता आणि बालगंधर्व चौकात सोमवारी संध्याकाळी गर्दी वाढू लागली. खंडूजी बाबा चौकात सुरू असलेले खोदकाम, डेक्कन, जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी घातलेल्या मंडपांच्या कमानींमुळे रस्त्यावरची कमी झालेली जागा आणि डेक्कन बस स्थानकासमोर रस्त्यावर घातलेल्या मंडपांचे देखावे पाहण्यासाठी सातत्याने होणारी गर्दी यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पाच दिवसांच्या गौरी- गणपतींच्या विसर्जनासाठी बाहेर पडलेली कुटुंबे आणि लहान मंडळांच्या वाजत- गाजत नदीघाटावर निघालेल्या विसर्जन मिरवणुकांमुळेही काही ठिकाणी वाहतूक अडून राहिली होती.
केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर डेक्कन परिसरातील लहान रस्ते आणि गल्ल्यांमध्येही एरवी सहसा न दिसणारी प्रचंड वाहतूक कोंडी सोमवारी बघायला मिळाली. सायंकाळी आपटे रस्ता, घोले रस्ता, शिरोळे रस्ता आणि या रस्त्यांना जोडणारे गल्लीबोळ वाहनांनी पूर्णत: बंद झाले. या गल्ल्यांवर नेहमीच उभ्या करुन ठेवल्या जाणाऱ्या मोटारींमुळे आणि गणपती बघायला आलेल्या नागरिकांनी लावलेल्या वाहनांमुळेही वाहतूक कोंडी वाढली.
इतर रस्तेही वाहनांनी गजबजलेलेच!
डेक्कन भागासह शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मध्य भागातही नागरिकांना वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. रस्त्यावरील गणपती मंडळांच्या मंडपांमुळे होणारी गर्दी आणि रस्त्यात मध्येच उभ्या करुन ठेवलेल्या चारचाकी गाडय़ा हेच या भागातही वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण दिसले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2015 रोजी प्रकाशित
गणपती विसर्जनाला डेक्कन परिसर ‘पॅक’ !
सायंकाळी साडेपाचच्या पुढे विशेषत: डेक्कन भागात प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळही वाहनांनी ‘पॅक’ झाले.
Written by दिवाकर भावे

First published on: 22-09-2015 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on the eve of ganpati immersion