पुणे : काश्मिरमधील अमरनाथ येथे मोठी ढगफुटी झाली आहे. यामध्ये काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून त्यामध्ये पुण्यातील दोन भाविकांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्री उशिरापर्यंत दुजोरा दिला नाही.
अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे.
काश्मीरमधील अमरनाथ या तीर्थक्षेत्राजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत आहे. यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अमरनाथ परिसरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, अमरनाथ यात्रेकरिता पुण्यातून गेलेल्या भविकांपैकी काही जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अद्याप मृत्यू झाल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. मंत्रालयातील आपत्कालीन कक्षाशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.