पुणे : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रप्रणालीचा वापर केला. यामध्ये स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर बॉम्ब आणि आत्मघाती ड्रोनचा वापर केला असून, राफेल विमाने आणि सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांनी लक्ष्यांचा अचूक भेद केल्याचे वृत्त आहे. याची अधिकृत माहिती सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

हा हल्ला करण्यासाठी भारताने राफेल लढाऊ विमाने आणि त्यावरील क्षेपणास्त्र आणि इतर प्रणालींचा वापर केल्याचे वृत्त आहे. फ्रान्सकडून घेण्यात आलेली राफेल विमानांचा वापर हल्ला करण्यासाठी केल्याची माहिती आहे. ही विमाने बहुउद्देशीय आहेत. हवाई सुरक्षा, टेहळणी, जमिनीवर अचूक हल्ला, जहाजविरोधी हल्ला, अणुहल्ला करण्याचीही या विमानांची क्षमता आहे. एकाच वेळी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवरही ही विमाने मारा करू शकतात.

स्कॅल्प क्षेपणास्त्रांना स्टॉर्म शाडो असेदेखील संबोधले जाते. हवेतून हे क्षेपणास्त्र डागले जाते. शत्रूला चकवा देऊन (स्टेल्थ) मारा करण्यासाठी हे क्षेपणास्त्र ओळखले जाते. सर्व प्रकारच्या वातावरणात आणि रात्रीही क्षेपणास्त्रे मारा करू शकतात. या क्षेपणास्त्रांच्या अशा वेगळ्या दर्जामुळे विविध देशांची संरक्षण दले त्याला पसंती देतात. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ३०० किलोमीटर असून, युरोपीय संघाच्या एमबीडीए या बहुराष्ट्रीय कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी ती योग्य मानली जातात.

याखेरीज, कामिकेझ ड्रोन अर्थात आत्मघाती अशा ड्रोन्सचा वापर करण्यात आला. ही ड्रोन लक्ष्याचा अचूक वेध घेतात. टेहळणी, लक्ष्यनिश्चिती आणि लक्ष्यभेद अशा टप्प्यांमध्ये हे ड्रोन काम करते. लक्ष्याभोवती ड्रोन्स घिरट्या घालतात आणि स्वयंचलित प्रणालीने अथवा रिमोट कंट्रोलने लक्ष्याचा भेद केला जातो.

या हल्ल्यांसाठी सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचाही वापर केला गेला असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.