खडकी येथील एका व्यावसायिकाचे इमेल फिशिंगव्दारे पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावरील ८० लाख परस्पर गुजरात आणि जम्मू काश्मीर राज्यात हस्तांतर करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांस अटक केली असून त्यांनी हे पैसे हस्तांतर करण्यासाठी आरोपींनी हैद्राबाद येथील एका शैक्षणिक संस्थेमधील आयपी अॅड्रेसचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. पाचजणांस न्यायालयाने नऊ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
फजलऊर रेहमान अब्दुलअमीन खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश), शाहरूख अब्दुलअमीन खान (वय २७, ), इमरान गफारभाई कालवा (वय ३३, रा. दोघेही- भावनगर, उत्तर प्रदेश ), दिनेश वालाजी कुंधाडीया (वय ५४, रा. वसई, ठाणे) आणि राजेंद्रसिंह रूपसिंह जडेजा (वय ४८, रा. भावनगर, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूना अॅटो अॅन्सीलीरीज या कंपनीचे खडकी येथील पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. या खात्यातून २५ ऑगस्ट २०११ रोजी अचानक ८० लाख गुजरात आणि जम्मू येथील बँकेत हस्तांतर झाले होते. या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर विभागाकडे होते. त्यांनी एक-एक धागे जुळवत हे रॅकेट उघडकीस आणले. आतापर्यंत ३७ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ातील मुख्य सुत्रधार बबलू ऊर्फ चिकण्या हा फरार आहे.