वीज निर्मितीसाठी ऊर्जा स्रोतांमधील थोरिअम वापरल्यास शेकडो वर्षे ऊर्जा निर्मिती करता येईल, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. तसेच, थोरिअमचा वापर केल्यास युरेनिअमवर अवलंबून रहावे लागणार नाही असेही ते म्हणाले.
हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी पानकुंवर फिरोदिया यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘वेध- विकासाच्या नव्या दिशांचे’ या विषयावर डॉ. काकोडकर यांचे व्याख्यान झाले. अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया आणि डॉ. शांता कोटेचा या वेळी उपस्थित होते.
काकोडकर म्हणाले, ‘‘चांगल्या जीवन स्तरासाठी वीज आवश्यक असल्यामुळे ऊर्जेला महत्त्वाचे स्थान आहे. जीवनस्तर उंचावण्यासाठी ऊर्जानिर्मितीत दसपटीने वाढ होणे महत्त्वाचे आहे. क्षय ऊर्जा स्रोत संपण्याच्या मार्गावर असताना अणुऊर्जेसाठी वापरले जाणारे थोरिअम वीजनिर्मितीसाठी वापरले पाहिजे. ते अधिक वर्ष टिकेल. अक्षय ऊर्जा स्त्रोतांमध्ये सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय आहे. भविष्यात केवळ हे दोन पर्यायच उपलब्ध असतील आणि त्या दृष्टीने ऊर्जेचे व्यवस्थापन करावे लागेल.’’  सौर ऊर्जेचा वापर ग्रामीण भागात शेतीसाठी तसेच वीज म्हणून करता येईल. अणुशक्तीसंदर्भात बोलताना ते म्हणाले,की अणुशक्ती संदर्भात लोकांच्या मनात गैरसमज असतात. पण अणुभट्टीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी आहे. याठिकाणी किरणोत्सर्गाचे प्रमाण जर मर्यादेखाली असेल तर कोणताही अपाय होत नाही. तसेच पर्यावरणाचाही ऱ्हास होत नाही.’
ग्रामीण विद्युतीकरण धोरणात बदल करणे गरजेचे आहे. सौर, पवन आणि इतर ऊर्जाचा समन्वय साधून वीज निर्माण करायला हवी. तसेच सध्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोचवून उपजीविकेचे साधन उपलब्ध करता येईल. ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवांचा अंतर्भाव असलेले विद्यापीठ उभारुन तज्ज्ञांना संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यातून ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधनाचा दर्जा उंचावणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.