Vaishnavi Hagawane वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघं राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरीने वैष्णवीला कसा त्रास दिला जात होता? ती गरोदर असताना तिचा कसा छळ केला जात होता हे सांगितलं आहे.
मयुरीने हगवणेने नेमकं काय सांगितलं?
“काहीही अन्याय झाला तरीही राजकीय दबाव पोलिसांवर आणला जात होता. माझ्या सासूने, नणंदेने आणि दिराने मला मारहाण केली होती आणि मला उचलून आपटलं होतं. माझा फोन घेऊन तो पळून गेला. मी त्यानंतर पौड पोलीस ठाण्यात गेले होते. पण त्यांनी सुरुवातीला माझी तक्रार दाखल करुन घेतली नाही. मी ९ वाजण्याच्या दरम्यान गेले होते. माझी तक्रार २ ते अडीचच्या दरम्यान दाखल करुन घेतली.” असं मयुरीने सांगितलं आहे. तसंच वैष्णवीवर कसा अन्याय होत होता ते देखील सांगितलं आहे.
वैष्णवीबाबत काय म्हणाली मयुरी?
“वैष्णवी आणि मी बोललोच नव्हतो. कारण वैष्णवी सगळ्यांना घाबरायची. तिने काय घडतंय ते सांगितलं असतं तर आम्ही दोघींनी मिळून काहीतरी केलं असतं. पण ते लोक दुष्टपणाच करत होते त्यामुळे वैष्णवी घाबरुन गेली होती. वैष्णवी गरोदर होती तेव्हाही तिच्यावर अन्याय होत होता. तिचा मोबाइल काढून घेतला होता. तिला उन्हात उभं केलं होतं. मला काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं. शशांकने तिला मारलं होतं हे मी काम करणाऱ्या लोकांकडून ऐकलं होतं. या सगळ्याचं मूळ कारण माझी नणंद आहे तिला आमचं कौतुक केलेलं पाहावत नव्हतं. आम्हाला साडी घेतली तरीही तिला त्रास होत होता. सासू सासरे बाजूला पण सगळं करिश्माच्याच म्हणण्याप्रमाणे चाललं होतं. वैष्णवीचा स्वभाव खूप मृदू आणि शांत स्वभावाची होती.” असं मयुरीने सांगितलं आहे.
१६ मेच्या दिवशी वैष्णवीची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.