मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी अपक्षांचा आटापिटा
विधानसभा निवडणुकीचा मतदानाला जेमतेम चार दिवस राहिले असल्याने रिंगणातील उमेदवारांची आणि त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांची धावपळ कित्येक पटीने वाढली आहे. वेळ कमी आणि कामे जास्त असल्याने दमछाक होत असल्याचा अनुभव सर्वानाच येत आहे. अपक्ष उमेदवारांना त्यांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागत असल्याने त्यांचाही आटापिटा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. शनिवारी (१९ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. जेमतेम ४ दिवस उमेदवारांच्या हातात आहेत. नेहमीच्या तुलनेत यंदा उमेदवारांना प्रचारासाठी मुळातच कमी दिवस मिळाले आहेत. उमेदवारी मिळण्यासाठीची स्पर्धा, त्यानंतरचे नाराजीनाटय़, कार्यकर्त्यांची मनधरणी यात सुरुवातीला बराच वेळ गेल्याचे अनेक उमेदवारांचे दुखणे आहे. अपक्ष उमेदवारांना मनासारखे चिन्ह मिळणे आणि चिन्ह मिळाल्यानंतर अधिकाधिक मतदारांपर्यंत ते पोहोचवणे, हे एकप्रकारे दिव्यच होते. त्यासाठी उमेदवारांना बराच वेळ द्यावा लागला.
या सर्वातून मार्ग काढून उमेदवारांनी गेल्या दोन आठवडय़ात शक्य तेवढा प्रचार केला. मात्र, झालेला प्रचार खूपच अपुरा वाटत असल्याने शेवटच्या टप्प्यात तरी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचता यावे, असे ध्येय जवळपास सर्वच उमेदवारांनी ठेवले आहे. त्यादृष्टीने नियोजनासाठी प्रत्येक उमेदवारांच्या तसेच त्यांच्या नेत्यांच्या कार्यालयात सकाळपासून लगबग सुरू होताना दिसते आहे.
वैयक्तिक संपर्कावर भर,समाजमाध्यमांचाही वापर
सभा, मेळावे, बैठकांऐवजी यापुढे वैयक्तिक संपर्कावर भर देण्याचे धोरण उमेदवारांनी ठेवले आहे. मतदारसंघांची व्याप्ती मोठी असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने मोठय़ा प्रमाणात समाजमाध्यमांचा वापर सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन ठेवून उमेदवारांनी त्याची तयारी आतापासूनच केली असल्याचे दिसत आहे.