अधूनमधून पडणारा पाऊस बंद होऊन सुरू झालेली ‘ऑक्टोबर हीट’ आणि आता हळूहळू थंडीकडे चाललेली वाटचाल अशा बदलत्या हवामानामुळे शहरात ‘ऱ्हायनोव्हायरल संसर्गा’चे अर्थात सर्दी-खोकल्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. थंडीचे वातावरण या संसर्गासाठी पोषक असल्यामुळे यापुढे त्यात अधिक वाढ होण्याचीही शक्यता आहे. साध्या सर्दी-खोकल्याखालोखाल विषाणूजन्य अतिसाराच्या (व्हायरल गॅस्ट्रोएंटेरायटिस) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
पुण्यात स्वाईन फ्लू हळूहळू कमी होताना दिसतो आहे, तर डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. याच वेळी सध्या इतर काही आजारही दिसून येत असून त्यात ऱ्हायनोव्हायरल संसर्ग सर्वाधिक दिसतो आहे. या साध्या सर्दी-खोकल्यात सर्दी, नाकातून पाणी गळणे, डोळ्यातून पाणी येणे, नाक चोंदणे, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात व २-३ दिवसांनंतर थोडासा खोकला येतो. हा आजार फ्लूसारखाच वाटत असला तरी फ्लूमध्ये आढळणारा तीव्र ताप ऱ्हायनोव्हायरल संसर्गात सहसा नसतो. ताप असला तरी सौम्य स्वरूपाचा असतो. बहुसंख्य रुग्णांमध्ये आजार उपचार न घेताही २ ते ३ दिवसांत बरा होतो.
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले, ‘विषाणूजन्य अतिसारात पोट दुखणे, पोटातून आवाज येणे, कळ मारणे, पातळ पाण्यासारखे जुलाब लागणे, कधीकधी त्याबरोबर उलटय़ा होणे, खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे दिसतात. यात योग्य दक्षता न घेतल्यास रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. हा आजार ४-५ दिवस टिकू शकतो व कोणतीही प्रतिजैविके न घेता जलसंजीवनीच्या (ओरल रीहायड्रेशन थेरपी) घरगुती उपचारांनीही रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु रुग्णाला शुष्कता (डीहायड्रेशन) होऊ न देणे महत्त्वाचे आहे. ते झाल्यास रक्तदाब कमी होऊ होऊन चक्कर येणे, मूत्रपिंडावर दुष्पपरिणाम होऊन लघवी कमी होणे अशा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. विषाणूंवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नसल्यामुळे अशा आजारात प्रतिजैविकांचा मारा न करता ‘हायड्रेशन’ गरजेचे ठरते.’ हे दोन्ही आजार वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास दुसऱ्यांपर्यंत पोहोचणे टाळता येते, त्यामुळे वारंवार हातांची स्वच्छता केल्याचा फायदा होतो, असेही ते म्हणाले.

सध्या दिसणारे इतर आजार
– गोवर, कांजिण्या व लहान मुलांमधील ‘हँड, फूट अँड माऊथ डिसिझ’. या तिन्ही आजारात तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी व नंतर शरीरावर पुरळ उठणे ही सामान्य लक्षणे.
– गोवर- चेहरा व कानाच्या पाठीमागील भागापासून लाल रंगाचे पुरळ येता व शरीरभर पसरत जातात, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे ही लक्षणे, तापाच्या चौथ्या दिवशी पुरळ उठते.
– कांजिण्या- तीव्र ताप व तापाच्या पहिल्याच दिवशी पुरळ, फोड मोठे होतात, त्यात पाणी भरते व फोड फुटून खपली धरते. चेहरा, तोंडाच्या आत, डोक्यावरील त्वचेवरही फोड येऊ शकतात.
– हँड, फूट अँड माऊथ डिसिझ- २ ते ५ वर्षे वयोगटात तीव्र ताप, तापाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच पाण्याचे फोड / पुरळ येते. हात, हाताचे तळवे, पाय, पायाचे तळवे व तोंडाच्या आत फोड येतात. तीन दिवसांत ते बरे होतात.
.
‘तीव्र ताप हा प्रकृतीत मोठा बिघाड असल्याचे दर्शवत असल्याने २ दिवसांपेक्षा अधिक राहिलेल्या तीव्र तापाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. १ ते २ दिवस घरगुती उपचार घेतले तर चालू शकते, पण प्रकृती बिघडल्यास त्याआधीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आजाराची खात्री करून घेणे आवश्यक आहे.’
– डॉ. भारत पुरंदरे