पुणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने शाळांमधील सुरक्षिततेसाठी खरेदी केलेले एक कोटी रुपयांचे डिझेल पंप वापरण्याआधीच वाया गेल्याची वस्तुस्थिती शनिवारी उघडकीस आली. संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा फक्त खरेदीत रस असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
तामिळनाडूमधील शाळेत आगीची दुर्घटना घडल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका शाळांमध्येही अग्निशमनाची योग्य ती यंत्रणा उपलब्ध असावी, अशी मागणी झाली होती. त्यानुसार महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने लगोलग नोव्हेंबर २०११ मध्ये साठ पोर्टेबल डिझेल फायर पंप खरेदी केले. त्यांची किंमत ९६ लाख रुपये इतकी आहे. ही खरेदी होऊन बावीस महिने झाले आहेत. दीड वर्षांपूवी हे पंप महापालिकेच्या पंधरा शाळांमध्ये दिले गेले.
मनसेचे गटनेता वसंत मोरे त्यांच्या प्रभागातील महापालिका शाळेत शनिवारी गेले असता त्यांना तेथे चार मोठय़ा लाकडी पेटय़ा दिसल्या. त्याबाबत चौकशी केली असता चार पेटय़ांमध्ये चार पंप असल्याची माहिती मिळाली. हे पंप शाळेत दिल्यापासून पेटीतून बाहेर देखील काढण्यात आले नसल्याची वस्तुस्थिती याचवेळी समोर आली. या पंपांच्या बॅटरीची एक वर्षांची हमी मुदतही संपून गेली असून पंप वापरात नसल्याने बॅटरीसह सर्व पंप वाया गेले आहेत.
ही खरेदी फक्त संबंधित कंपनीचा फायदा व्हावा यासाठीच करण्यात आल्याची तक्रार मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसे निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. एका शाळेची एकच इमारत असताना अशा शाळेतही चार-चार पंप देण्यात आल्याचे दिसून आले. तसेच ज्या शाळांना हे पंप देण्यात आले आहेत, तेथे पाण्याच्या मोठय़ा टाक्या असणे आवश्यक होते. मात्र, फक्त पंप खरेदी एवढाच उद्देश असल्याने त्याबाबतही शहानिशा न करता पंप दिले गेले. त्यामुळे हा सर्व खर्च वाया गेला आहे, असे मोरे म्हणाले.
या प्रकरणात त्वरित लक्ष घालून पुढील कारवाई करावी. दखल घेतली गेली नाही, तर हे सर्व पंप आपल्या कार्यालयासमोर मांडण्यात येतील, असाही इशारा आयुक्तांना देण्यात आला आहे.