|| शिवाजी खांडेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याच्या शक्यतेने नोटीस

पिंपरी : कंपनी नोंदणी कायद्यानुसार लघु वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात बँकेप्रमाणे कामकाज करणाऱ्या संस्थांचे राज्यात पेव फुटले आहे. नियमांचा भंग करून अतिरिक्त सभासद घेणे, जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुका वाढविणे, अपुऱ्या कागदपत्रावर कर्ज आणि त्यावर अधिकचा व्याजदर लावणे आदी प्रकार या संस्थांकडून करण्यात येत आहेत.

अशा कंपन्यांची नोंदणी करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढले असल्याने त्यांच्याबाबत संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनी नोंदणी कार्यालयाकडून त्यांना नोटीस देण्यात येत असून, या प्रकारात ४०० कोटींपर्यंत गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील कंपनी नोंदणी कार्यालयात संबंधित कंपन्यांची नोंदणी केली जाते. पुणे विभागातील नोंदणी कार्यालयांतर्गत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

या एकट्या विभागात दीड वर्षांपूर्वी अशा केवळ पाच कंपन्या होत्या. आता त्यांची संख्या तीनशेच्याही पुढे गेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही या कंपन्यांची संख्या वाढली आहे. या निधी कंपन्यांना फक्त दोनशे सभासद घेण्याचे बंधन आहे. या सभासदांमध्येच आर्थिक उलाढाल अपेक्षितच आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी शेकडो सभासदांना सामावून घेतले असून, जादा परताव्याचे आमिष दाखवून अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याकडे कंपन्यांचा कल दिसून येत आहे. कमी कागदपत्रे, सोने, गहाणखत नसले तरी कर्ज देण्याचे आश्वासन दिले जाते. एका कंपनीची नोंदणी केल्यानंतर विनापरवानगी त्यांच्या इतर शाखाही काही कंपन्यांनी सुरू केल्याचे आढळून आले आहे.

संबंधित कंपन्यांमध्ये अनधिकृत व्यवहार सुरू असल्याने गैरप्रकाराची शंका बळावली आहे. त्यामुळे कंपनी रजिस्ट्रार कार्यालयाने त्यांना कारवाईच्या नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांना प्रतिवर्ष फक्त सहा टक्के दराने व्याज आकारण्याचे बंधनकारक आहे; परंतु त्यांच्याकडून सतरा ते अठरा टक्के दराने व्याज आकारले जाते. या सर्व प्रकारामध्ये काही वकील, कंपनी सचिव तसेच लेखापालांची मदत घेतली

जाते.

कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या निधी कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना सध्या नोटीसा देण्यात येत आहेत. या कंपन्यांमध्ये छोट्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. – मंगेश जाधव, कंपनी नोंदणी अधिकारी, पुणे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Working like a bank on registration of microfinance institutions akp