Moong dal samosa recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे मुलं नेहमी वेगवेगळे पदार्थ खाण्याची मागणी करतात. अशावेळी रोज रोज त्यांच्यासाठी काय नवीन बनवायचं असा प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मूग डाळीचा समोसा ही हटके नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. आपण अनेक जण समोसा खातो, पण तो बटाट्याचा असतो; पण सतत बटाटा खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे तुम्ही हा मूग डाळीचा हेल्दी समोसा नक्की ट्राय करून पाहा. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

साहित्य :

१. ३ कप मूग डाळ (भिजलेली)
२. ३ कप मैदा
३. ३ चमचे गरम मसाला
४. ३ चमचे लाल मिरची पावडर
५. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ चमचे धने पावडर
७. १ चमचा ओवा
८. १ चमचा जिरे
९. मीठ चवीनुसार
१०. हिंग आवश्यकतेनुसार
११. तेल आवश्यकतेनुसार

कृती :

१. सर्वात आधी मैद्यामध्ये तेल, मीठ आणि ओवा आवश्यकतेनुसार पाणी टाकून कणीक मळून घ्या.

२. त्यानंतर सारण बनवण्यासाठी भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

३. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे, गरम मसाला, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धणे पावडर, मीठ चवीनुसार आणि बारीक केलेली मूगडाळ व्यवस्थित एकजीव करा.

४. हे मिश्रण गार झाल्यावर दुसरीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.

५. यातील अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्याप्रमाणे आकार द्या.

हेही वाचा: मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात अशी बनवा ज्वारीची हेल्दी इडली; नोट करा साहित्य अन् कृती

६. सर्व समोसे तयार भरून झाल्यानंतर ते गरम तेलात तळून घ्या.

७. तयार गरमा गरम मूग डाळीचे समोसे पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.