Fruit Sandwiches: सँडविच असा पदार्थ आहे की तो खायलाही टेस्टी लागतो आणि बनवायलाही वेळ लागत नाही. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सॅंडविच हा पदार्थ आवडतो. ऑफिसला जायचं असेल आणि नाश्ता बनवायला वेळ नसेल किंवा मुलं डबा घेऊन जाण्यासाठी तोंड वाकडं करत असतील, तर तुम्ही फळांच्या सँडविच चा पर्याय नक्की ट्राय करू शकता. फळं नेहमीच हेल्दी असतात, पण, त्याचं थोडं क्रिएटिव्ह कॉम्बिनेशन केलं की त्याची टेस्ट दुप्पट होते.
सकाळच्या नाश्त्याला, हलक्या भुकेसाठी, पिकनिकसाठी किंवा प्रवासात डबा घेऊन जाताना फळांचे हे सँडविच अगदी परफेक्ट ठरतात. बनवायलाही सोपे, दिसायलाही आकर्षक आणि खायलाही टेस्टी, त्यामुळे हे नएकदा बनवले की घरात नक्कीच रिपीट डिमांड होणार.

१. सफरचंद आणि पीनट बटरचे सँडविच

सफरचंद हे हेल्दी फळ म्हणून ओळखले जाते. त्याला पीनट बटरची जोडी दिली की सँडविच एकदम भारी लागते. होल व्हीट ब्रेडवर पीनट बटर लावा, त्यावर बारीक कापलेले सफरचंदाचे स्लाइस ठेवा. वर थोडी दालचिनी पावडर शिंपडा आणि दुसरा स्लाइस ठेवून ग्रिल करा किंवा तसंचदेखील खाऊ शकतात. हे सँडविच तुम्हाला एनर्जी देईल.

२. केळी व मधाचे सँडविच
केळं हे सहज मिळणारं आणि भरपूर फायबर देणारं फळ आहे. मल्टीग्रेन किंवा होल व्हीट ब्रेडवर मध लावून त्यावर केळ्याचे गोल स्लाइस ठेवा. हवे असल्यास त्यावर चिया सीड्स शिंपडू शकता. त्याने अधिक चव येईल, शिवाय पोटही बराच वेळ भरलेलं वाटतं.

३. अननस व चीजचे सँडविच
गोडसर अननस आणि चीज यांचे कॉम्बिनेशन मुलांना खूप आवडेल. ब्रेडवर चीज लावा आणि त्यावर अननसाचे छोटे तुकडे ठेवा. दुसरा स्लाइस ठेवून तसंच खा किंवा ग्रिल करा. हे सँडविच प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.

४. मिक्स फळ-दह्याचे सँडविच
जर घरात विविध फळं असतील, जसं की सफरचंद, केळी, आंबा; तर ती बारीक कापून दह्यामध्ये मिक्स करा. त्यात थोडे मध आणि वेलची पूड घालून ब्रेडवर पसरवा. वर दुसरा स्लाइस ठेवला की झाले एकदम टेस्टी आणि पौष्टिक सँडविच तयार! हे खाल्ल्यावर शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

५. स्ट्रॉबेरी-क्रीमचे सँडविच
स्ट्रॉबेरीची गोडसर चव आणि क्रीमचं सॉफ्ट टेक्स्चर एकदम डेजर्टचे फिलिंग देतं. स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे करून त्यात थोडं क्रीम आणि साखरेची पावडर मिक्स करा. ब्रेड स्लाइसवर पसरवा, वर दुसरा स्लाइस ठेवून थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. हे सँडविच थंड खाल्ल्यावर चव अतिशय सुरेख लागते.