चिकन, मटण मासे यांसारख्या मांसाहारी पदार्थांबरोबर पिण्यासाठी कोकणात एक खास पेय बनवले जाते. ते म्हणजे, मस्त आमसूल, नारळ वापरून बनवलेली गुलाबी रंगाची थंडगार सोलकढी. सोलकढी दिसायला जेवढी सुंदर असते तेवढीच तिची भन्नाट चव आणि फायदेही असतात. ज्यांना पित्ताचा त्रास असेल, नॉनव्हेज खाल्यानंतर जळजळ होत असेल, अशांसाठी सोलकढी म्हणजे रामबाण उपाय.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे कि, सोलकढी ही पित्तनाशक असते. त्यामुळे घरी जेव्हा झणझणीत चिकन किंवा मटणाचा बेत होईल तेव्हा अगदी झटपट तयार होणारी ही गारेगार सोलकढी नक्की बनवून पाहा. युट्युबवरील SwatisHealthyKitchen नावाच्या अकाउंटने सोलकढी मालवणी पद्धतीने कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवली आहे, ती पाहू.

हेही वाचा : Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

मालवणी पद्धतीची सोलकढी :

साहित्य

१ नारळ
१५ ताजे कोकम
२ हिरव्या मिरच्या
३-४ लसूण पाकळ्या
आले
जीरे
साखर
चवीनुसार मीठ
पाणी
कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम ओल्या नारळाचे तुकडे करून घ्यावे. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
आता नारळाच्या तुकड्यांबरोबर, आल्याचे २ तुकडे, ५ लसणाच्या पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या घालून घ्या.
त्याचसोबत २ चमचे जिरे, २ चमचे साखर आणि बीटाचा एक लहान तुकडा घालून घ्या.
आता मिक्सरच्या भांड्यात एक भांडे पाणी घालून सर्व पदार्थ मिक्सरला चांगले बारीक होईपर्यंत वाटून घ्या.
सोलकढीसाठी नारळाचे दूध तयार झालेले आहे.
नारळाचे दूध सोलकढीसाठी वेगळे काढून घेऊ.

हेही वाचा : Recipe : फणसाचा चमचमीत खिमा! Vegan आहार घेणारेदेखील आवडीने खातील; रेसिपी घ्या

त्यासाठी एक पातेले घेऊन त्यावर एक चाळणी ठेवा.
त्या चाळणीमध्ये मिक्सरमध्ये तयार केलेले नारळाचे मिश्रण घालून घ्या आणि चमच्याच्या मदतीने नारळाचे सर्व दूध पातेल्यामध्ये काढून घ्या.
आता चाळणीमधील मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून, त्यात थोडे पाणी घालून वाटून घ्या व वर सांगितलेली कृती करावी.
सोलकढीसाठी नारळाचे दूध काढण्यासाठी ही क्रिया किमान ३ वेळा करावी.

आता पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या नारळाच्या दुधात कोकमाची आगळ किंवा कोकमाची रस घालून घ्यावा.
तसेच, चवीनुसार मीठ घालून सोलकढी छान ढवळून घ्या.
आता एक काचेचा बाउल घेऊन त्यामध्ये तयार झालेली सोलकढी गाळण्याने गाळून घ्या.
सर्वात शेवटी कोथिंबीर घालून सोलकढी अर्ध्यातासासाठी गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावी.
थंडगार सोलकढी पिण्यासाठी तयार आहे.

युट्युबवरील @SwatisHealthyKitchen नावाच्या चॅनलने ही सोपी सोलकढी रेसिपी शेअर केली आहे.