Masala milk recipe: भारतीय सणांमध्ये कोजागिरी पौर्णिमा हा एक खास आणि आनंदाचा सोहळा मानला जातो. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ६ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. थंडगार चांदण्यांच्या रात्री कुटुंबासोबत मसाला दूध पिण्याची ही पारंपरिक प्रथा अनेक वर्षांपासून आपल्या संस्कृतीत जपली गेली आहे. आजही लोक घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा परिसरात एकत्र जमून या सणाचा आनंद घेतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुका मेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते. आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरीच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल तर हा लेख वाचा.

कोजागिरी दुधासाठी लागणारी सामग्री

  • दूध – १ लिटर
  • साखर – ४ ते ५ चमचे ( चहाचा छोटा चमचा )
  • वेलची पूड – अर्धा चमचा ( टेबलस्पून )
  • जायफळ किसलेले – चिमूटभर
  • केशर – ८ ते १० धागे
  • बदाम – ८ ते १० (बारीक कापलेले)
  • पिस्ते – ६ ते ७ (कापलेले)
  • काजू – ६ ते ७ (कापून)
  • ड्रायफ्रूट पावडर (असल्यास) – १ चमचा ( टेबलस्पून )

१. दूध गरम करा :

एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा.

२. केशर भिजवणे :

१-२ टेबलस्पून गरम दुधात केशर घालून बाजूला ठेवा.

३. साखर मिसळा :

दूध उकळल्यावर त्यात साखर घाला आणि व्यवस्थित विरघळू द्या.

४. मसाले घाला :

वेलची पूड, जायफळ व केशर दुधात मिसळा.

५. ड्रायफ्रूट घाला :

बदाम, पिस्ते, काजू आणि ड्रायफ्रूट पावडर घालून आणखी ५ मिनिटं उकळा.

दूध थोडं कोमट झाल्यावर चांदण्यांखाली किंवा बाल्कनीत सर्व्ह करा. कोजागिरीचे हे विशेष मसाला दूध गरम असतानाच बाऊलमध्ये काढून घ्या आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थंड झाल्यावर प्या.