[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

`काहीच नीट घडत नाहीये आयुष्यात. खूप वैताग आलाय!` सोनाली अगदी कळवळून सांगत होती. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. `एवढी मेहनत करूनसुद्धा नोकरीत प्रमोशन मिळत नाही, काही कारण नसताना बॉसची बोलणी खावी लागतात, घरी काही नीट नाहीये, खूप खर्च वाढलेत आणि तेवढे पैसेच हातात येत नाहीयेत. नवऱ्याच्या नोकरीचंही सध्या काही धड नाहीये, आईवडिलांशी संबंधही ताणले गेले आहेत…` बोलताना तिला श्वास लागला होता. पुढचा काही काळ शांततेत गेला. धीरगंभीर मुद्रेने समोर बसलेल्या अंकित आकडेवारांनी डोळे मिटून काही काळ ध्यान केलं. समोर ठेवलेल्या मोठमोठ्या ग्रंथांची काही पानं चाळली. बोटांशी चाळा केला आणि ते पुन्हा मौनात गेले. आकडेतज्ज्ञ म्हणून गेली अनेक वर्षं अंकित आकडेवार यांची ख्याती होती. भाग्यांक, रेखांक यात त्यांचा हात धरणारं कुणी नव्हतं. अर्थात, त्यांच्या ज्ञानाचा गैरफायदा घेऊ इच्छिणारेही कमी नव्हते. मध्यंतरी कुणीतरी त्यांना मुद्रांक विचारायला आलं होतं. सोनाली मात्र आली होती तिची खरंच गंभीर समस्या घेऊन. अंकित आकडेवारांनी तिच्याकडून सगळी परिस्थिती समजून घेतली. तिच्या माहेरची, सासरची माणसं, त्यांच्याशी असलेलं नातं, तिची आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थान, कौटुंबिक नातेसंबंध, सगळं समजून घेऊन त्यांनी तिला शेवटी सोनालीचं स्पेलिंग बदलायचा सल्ला दिला. फक्त नाव बदलून आपलं नशीब बदलू शकेल, सगळ्या समस्या दूर होतील, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण अंकित आकडेवारांबद्दल अविश्वास दाखवणंही शक्य नव्हतं. सोनाली शांतपणे घरी आली आणि तिनं शांतपणे विचार केला. नाव बदलण्याचा सल्ला तिला मनापासून पटला नव्हता. थोडा अधिक विचार केल्यावर तिला लक्षात आलं, की नेहमीच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करण्यानंही आयुष्यात खूप फरक पडू शकतो. एखादी चटकदार भाजी आपण अध्येमध्ये करतोच. पण नुसती पोळीबरोबर ती खाण्यापेक्षा जर पोळीत गुंडाळून, रोल करून दिली, तर त्याला लगेच फ्रॅंकी असं ट्रेंडी नाव मिळून तिचं महत्त्वच वाढून जातं अचानक. त्या दिवशी तिनं फ्रॅंकीचा प्रयोग केला आणि नवऱ्यानंही फ्रॅंकली तिचं कौतुक केलं. तिचा डबा बॉसनंही बोटं चाटत खाल्ला आणि सोनालीचं आयुष्य बदलून गेलं. आपणही आज फ्रॅंकीचा प्रयोग करून बघूया का?

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • स्टफिंग
  • २ बटाटे उकडून
  • २ वाट्या कोबी, पातळ उभा चिरून
  • १ वाटी गाजर, पातळ उभे कापून
  • १ वाटी भोपळी मिरची, पातळ उभे काप
  • १ टी स्पून तेल
  • १ टी स्पून आले पेस्ट
  • १ टी स्पून लसूण पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  • टोमॅटो सॉस
  • फ्रॅंकी रॅप्स
  • ३/४ वाटी मैदा
  • २ टी स्पून तेल
  • १/२ टी स्पून मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • पॅनमध्ये १ टी स्पून तेल गरम करावे. त्यात आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतावे.
  • आता भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून परतावे. बटाटे बारीक करून घालावेत. लगेच टोमॅटो सॉस आणि मीठ घालून मिक्स करावे. खूप जास्त वेळ परतू नये, नाहीतर भाज्या मऊ होतात. हे मिश्रण एका वाडग्यात काढून ठेवावे.
  • मैदा, २ टी स्पून तेल, मीठ आणि पाणी घालून एकदम मऊ मळून घ्यावे.
  • मळलेल्या पीठाचे समान लिंबाएवढे गोळे करून घ्यावेत. पातळसर पोळी लाटून घ्यावी. तोडे तेल घालून नीट भाजून घ्यावी. तयार मिश्रण पोळीच्या मध्ये उभट पसरावे.
  • नंतर खालची थोडी बाजू वर दुमडावी आणि राहिलेली डोवी उजवी दोन्ही बाजू एकावर एक ठेवून फ्रॅंकी तयार करावी. थोडे प्रेस करून थोडे गरम होऊ द्यावे.
  • गरम फ्रॅंकी टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावी.
  • मैद्याच्याऐवजी गव्हाची पोळीसुद्धा करू शकता. चिली सॉस, सोया सॉस, वेगवेगळे मसाल्यांचा वापरसुद्धा आपापल्या आवडीनुसार करता येईल.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make veg frankie