बऱ्याचदा योग्य प्रमाणात जेवण बनवणे कठीण असते. यात विशेषत: दुपारी किंवा रात्रीचे जेवण बनवताना काहीवेळा भाजीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे भाजी उरते. अशावेळी कुटुंबातील सदस्य परत त्याच भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात. पण, रोज भाज्या फेकून देणेसुद्धा योग्य वाटत नाही. अशावेळी उरलेल्या भाज्यांचा वापर करून तुम्ही चविष्ट कटलेट तयार करू शकता. आज आम्ही उरलेल्या भाज्यांपासून स्पेशल कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

१) उरलेली कुठलीही भाजी – २ वाट्या
२) उकडलेले बटाटे – २
३) आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
४) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २ ते ३
५) ब्रेडचा चुरा -२ कप
६) मीठ चवीनुसार
७) तेल – २ चमचे
८) लाल तिखट – १ चमचा
९) हळद – १ चमचा
१०) कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उरलेली कुठलीही भाजी, बटाटा, आलं, लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद आणि मीठ घ्या. हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्या. यानंतर काही मिनिटे असेच ठेवा. आता तळहात पाण्याने ओला करा. यानंतर तयार मिश्रण कटलेटच्या आकारात थापून घ्या. आता ते ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून कमी तेलात तळून घ्या. अशाप्रकारे तुमचे कटलेट खाण्यासाठी तयार आहेत, जे तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.