Navratri Special Kadakani : सध्या सर्वत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे, तर आज अष्टमी आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला अनेक नैवेद्य दाखवले जातात. तर आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल “गुळाच्या कडाकण्या’ कशा बनवायच्या हे सांगणार आहोत. सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकण्यांच्या नैवेद्य देवीला दाखवण्यात येतो. कडाकण्यांची माळ तयार करून देव्हाऱ्यात लावण्यात येते किंवा नैवेद्य म्हणूनही देवीजवळ ठेवण्यात येते. तर गुळाच्या कडाकणी कशा बनवल्या जातात चला पाहूयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

बेसनचे पीठ
गूळ
मीठ
पाणी
हळद
तेल
वेलची

कृती :

. सगळ्यात आधी अर्धा वाटी साधं पाणी घेऊन त्यात पाव किलो गूळ मिक्स करा. कारण- पाण्यात गूळ पटकन विरघळतो.
२. परातीत पाव किलो बेसनाचे पीठ घेऊन त्यात गुळाचे पाणी मिक्स करून घ्यावे.
३. बेसनच्या पिठात गुळाचे पाणी मिक्स करून घेतल्यानंतर त्यात हळद, मीठ, वेलची पूड टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे.
४. पीठ मळून घेताना किंवा पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तुम्ही तेल लावू शकता.
५. मळून घेतलेलं पीठ १०-१५ मिनिटे किंवा अर्धा तास झाकून ठेवा.
६. त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
७. गोळे लाटताना तुम्ही पुरीसारखे गोल आकारात लाटू शकता किंवा पिठाचे गोळे लाटून त्यावर हात ठेवून किंवा तुम्हाला ज्या आकारात कडाकणी हवी असेल, त्या आकाराच्या वस्तू तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आणि लाटून घेतलेल्या पिठाची त्याप्रमाणे रचना करून घ्या.
(काही जण पाच विविध आकारात कडाकणी बनवतात. उदाहरणार्थ : खायची पाने, हाताचा ठसा, चांदणी, चंद्र किंवा पुरीच्या आकारात कडाकणी बनवल्या जातात…)
८. त्यानंतर कढईत तेल गरम करून घ्या.
९. तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर तुम्ही लाटून घेतलेल्या पुरी कढईत सोडा आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या.
१०. अशा प्रकारे तुमच्या गुळाच्या कडाकणी खाण्यासाठी तयार…

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special jaggery kadakani recipe asp