Peruchi koshimbir : कांदा, दही, टोमॅटो, कोथिंबीर, आणि इतर भाजीच्या मिश्रणाला कोशिंबीर म्हणतात. अनेकांना जेवणाबरोबर चटणी किंवा कोशिंबीर खायला आवडते. तुम्हालाही कोशिंबीर खायला आवडते का? जेवणाबरोबर कोशिंबीर खाल्ल्याने जेवणाचा स्वाद दुप्पट होतो. त्यामुळे जेवताना अनेकदा आवडीने कोशिंबीर खाल्ली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कोशिंबीर खायला आवडते. कोशिंबीर जितकी चवीला स्वादिष्ट असते तितकीच आरोग्यदायी आणि पौष्टिक सुद्धा असते.
अनेकदा आहारतज्त्र सुद्धा नियमित जेवणाबरोबर कोशिंबीर खाण्याचा सल्ला देतात. कोशिंबीरमधून मिळणारे पौष्टिक घटक शरीर हेल्दी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी आहाराचा भाग म्हणून तुम्ही तुमच्या आहारात कोशिंबीरचा समावेश करू शकता. पौष्टिक पदार्थ म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. कोशिंबीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तुम्ही कधी पेरूची कोशिंबीर खाल्ली आहे का? तुम्ही घरच्या घरी पेरूची कोशिंबीर बनवू शकता. सध्या बाजारात पेरू आले आहेत आणि पेरू खाण्याचे सुद्धा अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही लोकांना पेरू खाल्ल्यानंतर खूप लवकर सर्दी होते. असे लोक इच्छा असूनही पेरू खात नाही. तुम्हालाही पेरू खायचे असेल तर ही पेरूची कोशिंबीर बनवून खा. पेरुची कोशिंबीर कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.

साहित्य :

  • पिकलेले पेरू
  • बटाटे
  • कांद्याची पात
  • कांदे
  • हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : Vangyache Bharit : वांग्याचे कोरडे भरीत कसे बनवायचे? जाणून घ्या, ही रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • सुरुवातीला बटाटे चांगले उकळून घ्यावे
  • त्यानंतर हे बटाटे थंड झाले की सोलून घ्यावे
  • बटाटे, कांदा, कांद्याची पात, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने बारीक चिरावीत.
  • आणि पेरूचा गर बारीक करावा.
  • हे सर्व मिश्रण एकत्र करावे.
  • त्यात मीठ आणि साखर घालावी.
  • त्यात वरुन लिंबाचा रस पिळावा
  • कोशिंबीर गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावी
  • तुमची कोशिंबीर तयार होईल
  • तुम्ही ही कोशिंबीर सर्व्ह करू शकता.

विशेष म्हणजे जर तुम्हाला ही कोशिंबीर उपवासासाठी करायची असेल कर त्यात तुम्ही पुदिना आणि कांदे टाकू नका. त्याऐवजी जिरेपूड घालावी.
त्यानंतर तुम्ही ही कोशिंबीर उपवासाला खाऊ शकता.