कोणतीही गोष्ट मिळवण्याचा एक मार्ग मात्र असतो. त्या मार्गानंच एकेक टप्पा गाठत गेलं तरच ती गोष्ट प्राप्त होते. मोक्षाचंही तेच आहे. मोक्षप्राप्तीचाही एक अनुक्रम आहे! देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे। तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।। या ओवीतही तेच स्पष्ट सांगितलं आहे. हा अनुक्रम म्हणजे वर्णाश्रमानुसारचं धर्माचरण मात्र नव्हे. मग हा अनुक्रम कोणता आहे? बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध हाच तो अनुक्रम आहे! या प्रत्येक टप्प्यावर स्वरूपी राहण्याच्या स्वधर्माचं पालन केलं तरच पुढच्या टप्प्यावर पाऊल टाकता येतं. म्हणूनच माउली सांगतात, ‘देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे।’ स्वरूपाचं भान कोणत्याही टप्प्यावरून सुटलं तरी घसरण निश्चित ठरलेली आहे. त्यातही गंमत अशी की, घसरणीची ही भीती टप्पा जसजसा वाढत जाईल तसतशी वाढत जाते. शिखर जितकं गाठावं तितकी घसरणीची शक्यता वाढते. पायथ्याशीच जो आहे त्याला घसरण कोणती? त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर जो स्वधर्माचं आचरण करतो तो त्या ‘व्यापारा’नं मोक्ष निश्चित प्राप्त करतो! ‘तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।।’ व्यापार कसा असतो? त्यात गुंतवणूक असते, श्रम असतात, चिकाटी असते. माणसाच्या मनोव्यापारातही हेच सारं असतं. त्या मनोव्यापारात त्याची भावनिक गुंतवणूक असते, त्याचे श्रम असतात, चिकाटी असते. जेव्हा माणसाचे सारे मनोव्यापार हे ‘स्वरूपी राहाणे हा स्वधर्म’ या सूत्रानुसार स्वरूपस्थ राहण्यासाठी केंद्रित होतील तेव्हाच मोक्षाची आशा निर्माण होईल. ‘दासबोधा’चं विवरण करताना पू. बाबा बेलसरे यांनी म्हटलं आहे की, ‘‘जगातील सर्व माणसे फक्त दोनच वर्गात बसविता येतात. एक वर्ग अज्ञानी माणसांचा आणि दुसरा वर्ग ज्ञानी माणसांचा. अशी कल्पना करावी की, पृथ्वीला समांतर असणाऱ्या सरळ रेषेवर सर्व माणसे उभी आहेत. रेषेचा आरंभबिंदू म्हणजे अज्ञानी माणसे, रेषेचा अंतबिंदू म्हणजे ज्ञानी माणसे समजावी. मग पारमार्थिक प्रगती म्हणजे आरंभबिंदूकडून अंतबिंदूकडे अधिकाधिक सरकणे. अज्ञान सांगते की, मी खरा आहे, देव खरा नाही. ज्ञान सांगते की, मी खरा नाही, देव खरा आहे. ज्या प्रमाणात माणसांच्या मीपणाचे, अहंकाराचे खरेपण कमी होत जाईल त्या प्रमाणात देवाचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल. अज्ञानाचे मुख्य चिन्ह असणारा देहाभिमान कमी कमी होत जाणे हे पारमार्थिक प्रगतीचे मुख्य लक्षण समजावे. अत्यंत अज्ञानी माणसाला समर्थानी ‘बद्ध म्हणजे बांधलेला’ असे नाव दिले तर संपूर्ण आत्मज्ञानी माणसाला त्यांनी ‘सिद्ध म्हणजे प्राप्त झालेला’ असे नाव दिले. आपण कल्पना केलेल्या रेषेला मध्यबिंदू आहे. त्यामुळे माणसांचे आणखी दोन वर्ग शक्य होतात. आरंभबिंदू सोडून मध्यबिंदूकडे सरकणारा तिसरा वर्ग आणि मध्यबिंदूकडून अंतबिंदूकडे सरकणारा चौथा वर्ग. तिसऱ्या वर्गातील माणसांना ‘मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा’ असे नाव दिले तर चौथ्या वर्गातील माणसांना ‘साधक म्हणजे साधन करणारा’ असे नाव दिले.’’ तेव्हा मोक्षाकडे नेणारा हा अनुक्रम आहे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध.