जनक आदींना भौतिकात राहूनच, सर्व व्यवहार पार पाडत असतानाच मोक्षसुख मिळालं कारण भौतिकात असूनही ते भौतिकाच्या प्रभावापासून अलिप्त होते. व्यवहारातील चढउताराकडे ते तटस्थपणे पाहू शकत होते. आपण मात्र व्यवहारात नेहमी लाभच व्हावा, यशच मिळावं याच हेतूनं वावरतो. आता या हेतूतही काही गैर नाही, पण यशाला, लाभाला अनेक घटक कारणीभूत असतात, याचं भान आपण बाळगत नाही. लाभासाठी, यशासाठी प्रयत्न जरूर करावा पण त्या प्रयत्नांनंतर जे वाटय़ाला येईल ते स्वीकारून पुढे जाता आलं पाहिजे. जीवनात सुख असणार, दु:खंही असणार. यश असणार, अपयशही असणार. लाभ असणार, हानीही असणार. मान होणार, अपमानही होणार. स्तुती होणार, निंदाही होणार. कारण भौतिकातला, प्रपंचातला समस्त व्यवहार हा द्वंद्वमयच आहे. जीवन हे मिश्रण आहे. फक्त सुख, फक्त यश, फक्त लाभ, फक्त मानसन्मान, फक्त स्तुती असं जीवनात असूच शकत नाही. या जीवनवास्तवाचा जितक्या लवकर आपल्याला स्वीकार करता येईल तितक्या लवकर त्याच्या प्रभावातून सुटून आपल्याला खऱ्या प्राप्तीसाठी पाऊल टाकता येईल. स्वामी स्वरूपानंद जीवनातील या द्वंद्वाकडे एका सुंदर रूपकाद्वारे पाहायला शिकवतात. पू. गुंगूताई रघुनाथ देसाई यांनी लिहिलं आहे की, ‘‘व्यवहार आणि परमार्थ यांची फारकत करू नये, हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी (स्वामींनी) एकदा सांगितलं होतं की, पुस्तकात पानं असतात. कशी असतात? विषम आणि सम! विषम पानानं पुस्तक सुरू होतं पण त्या विषम पानामागे सम पान असतंच. विषम आणि सम पानं एकत्र आली म्हणजे पुस्तक तयार होतं. जीवनात ही विषम पानं म्हणजे व्यवहार आहे आणि सम पानं म्हणजे परमार्थ आहे! नुसती विषम पानंच घेतली तर पुस्तक कसं होईल? तसंच नुसती सम पानं असूनही होणार नाही. आपल्या जीवनाचा ग्रंथ कसा भक्तिमय समर्पित असा या विषम आणि सम पानांचा असावा. सत्त्वनिष्ठ व्यवहाराची विषम पानं आणि त्यामागेच ईश्वरनिष्ठेची सम पानंही असावीत. असं झालं की जीवन कृतार्थ होतं!’’ (स्वामी स्वरूपानंद : एक अलौकिक राजयोगी, पृ. ८२). तर जीवनातला हा विषम-सम, व्यवहार व परमार्थ अशा दोन्ही अंगांचं खरं स्वरूप जाणून जनक आदी योगी वावरले. द्वंद्वात राहून द्वंद्वातीत झाले. सत, रज, तम या तीन गुणांच्या जगात वावरत असतानाच त्यांच्या पकडीतून मुक्त होऊन मोक्षसुखाचे धनी झाले. त्यांची कृपा अशी की आत्मतृप्त होऊन आत्ममग्न झाले नाहीत. निष्काम होऊनही त्यांनी लोकांना जागं करण्याची भूमिका स्वीकारली. या कर्तव्यापुरता सर्व तो व्यवहार केला. ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओव्याही सांगतात की, ‘‘देखें प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयांही कर्तव्य असे उरलें। लोकांलागीं।।३१।। मार्गी अंधासरिसा। पुढें देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा। आचरोनि।।३२।। एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्म ठेविती। तें चि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। ३३।।’’ आता या ओव्यांच्या अनुषंगानं आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांनी काय बोध घ्यावा? त्याचा विचार करू.