जगात वावरताना वावर निवांत नसतो याचं कारण जगाचं खरं स्वरूप आपल्याला उमगत नाही. या जगात आपल्यासकट प्रत्येक जण स्वार्थकेंद्रित आहे आणि त्यामुळेच प्रत्येक जण स्वत:च्याच अपेक्षांनुरूप जगाकडे पाहतो आणि सुख अपेक्षितो आहे. त्यामुळेच अनेकवार अपेक्षाभंगाचं दु:खंही भोगतो आहे. जोवर जगाचं मायाजन्य स्वरूप मनावर ठसत नाही, तोवर जगाचा मोह आणि अपेक्षाभंगाचं दु:ख कधीच आटणार नाही. त्यासाठी सद्गुरूंचाच संग अनिवार्य आहे. जगाच्या धबडग्यात अशांत झालेलं मन कोणत्याही कारणानं सद्गुरूपाशी आलं तरी कधीही न अनुभवलेली शांती अनुभवतं. साधकाला आपल्यापर्यंत आणण्याची प्रक्रिया सद्गुरूच कशी पार पाडतात आणि त्याला शांत, संस्कारित कसं करतात याची अनेक उदाहरणं स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात आहेत. स्वामींनी आपल्या वास्तव्यानं ज्या देसाई कुटुंबावर अखंड कृपाछत्र धरलं त्या कुटुंबातील जयंत देसाई यांची आठवणच पाहा. हा प्रसंग घडला तेव्हा ते विशी पार केलेले होते. ते लिहितात, ‘‘१९६५ सालातील गोष्ट. रात्रीची साडेआठची वेळ. बाहेर पाऊस पडत होता व चांगलाच काळोखही होता. घराबाहेर पावले वाजली. घरात कोणी आहे का, असे विचारीत दोघे बाहेर उभे होते. ‘कोण पाहिजे?’ मी विचारले. ‘स्वामींकडे आलो आहोत,’ ते उद्गारले. घरात मी आणि भावंडं एवढेच होतो. ‘आप्पांना विचारतो,’ असं सांगून मी घरात पळालो. (हे बाबालाल पठाण मुस्लीम होते आणि अशा रात्रीच्या वेळी स्वामींजवळ मोठं माणूस कुणी नसताना पठाण यांच्या त्या वेळच्या बाह्य़रूपामुळे जयंतराव काहीसे घाबरले असावेत.) खोलीत गेलो आणि विचारले. आप्पा (अर्थात स्वामी) म्हणाले, ‘घाबरायचे काही कारण नाही. त्यांना घोंगडय़ा व सतरंजी दे. प्रसाद नेऊन दे. स्वामी उद्या सकाळी भेटतील सांग. ते येथेच पडवीत झोपतील.’ ते होते बाबालाल पठाण. घरात कडाक्याचे भांडण झाले आणि एकमेकांच्या उरावर बसले होते. पण डोकी फोडण्यापेक्षा स्वामींकडे जावे म्हणून निघून आले. स्वामीजींचे दर्शन घेतले मात्र इतके शांत झाले की ते स्वामीजींचे अनन्य भक्त झाले’’ (अनंत आठवणीतले ‘अनंत निवास’/ पृ. ५६). जीवनात तेढ उत्पन्न होते, मन अशांत होतं, अस्थिर होतं अशा वेळी सद्गुरूकडे जावंसं वाटणं, ही देखील त्यांचीच कृपा. मुंबईत ब्रिटिश राजवटीत अब्दुल रहमान नावाचे एक अवलिया होते. त्यांच्या नावानं एक रस्ताही आहे. ते बाह्य़त: वेडसर वाटत आणि त्यामुळेच पोलिसांनी एकदा त्यांना डोंगरीच्या तुरुंगात टाकले. रात्रपाळीवर आलेला निरीक्षक रागातच होता. त्याला हसून अब्दुल रहमान म्हणाले, ‘‘घरी बायकोशी भांडल्यानं आलेला राग इथं काढतोय!’’ तो संतापून म्हणाला, ‘‘जादा बोलू नकोस तुला कायमचं आत राहावं लागेल.’’ बाबा हसून म्हणाले, ‘‘माझ्या मर्जीशिवाय मला कोण आत टाकणार?’’ एवढं बोलून ते बंद गजांआडून बाहेर येऊन बसले. निरीक्षकाची तारांबळ उडाली. तुम्ही निघून गेलात तर माझ्यावर कारवाई होईल, कृपा करा, अशा त्याच्या विनवण्यांनंतर बाबा हसत गजाआड गेले. पण या कृतीतही अर्थ आहे!