दत्तात्रेय होसबाळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांच्या प्रवासात अनेक लोक सहयोगी आणि सहभागी राहिले आहेत. हा प्रवास निश्चितच परिश्रमपूर्ण आणि काही संकटांनी वेढलेला होता, परंतु सामान्य लोकांचे समर्थन ही त्याची सुखद बाजू राहिली. आज शताब्दी वर्षात विचार करतो, तेव्हा अशा अनेक प्रसंगांचे आणि लोकांचे स्मरण होते, ज्यांनी या प्रवासाच्या यशासाठी स्वतःचे सर्वस्व समर्पित केले.
प्रारंभिक काळातील ते तरुण कार्यकर्ते एका योद्ध्याप्रमाणे देशप्रेमाने भारलेले होऊन संघ कार्यासाठी देशभर निघाले. अप्पाजी जोशींसारखे गृहस्थ कार्यकर्ते असोत किंवा दादाराव परमार्थ, बाळासाहेब व भाऊराव देवरस बंधू, यादवराव जोशी, एकनाथ रानडे यांसारखे प्रचारक, या सर्व लोकांनी डॉक्टर हेडगेवारजींच्या सान्निध्यात येऊन संघ कार्य हे राष्ट्रसेवेचे जीवनव्रत मानून जीवनभर ते चालू ठेवले. संघाचे कार्य सातत्याने समाजाच्या समर्थनामुळेच पुढे सरकत गेले.
संघाचे कार्य सामान्य जनतेच्या भावनांना अनुरूप असल्यामुळे त्याची स्वीकारार्हता समाजात हळूहळू वाढत गेली. स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांच्या परदेश प्रवासात विचारले गेले की, ‘तुमच्या देशात जास्तीत जास्त लोक निरक्षर आहेत, त्यांना इंग्रजी येत नाही, मग तुमच्या मोठ्या-मोठ्या गोष्टी भारतातील लोकांपर्यंत कशा पोहोचतील?’ यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘ज्याप्रमाणे मुंग्यांना साखरेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजी शिकण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे माझ्या भारतातील लोक त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे कुठल्याही कोपऱ्यात चाललेले सात्त्विक कार्य लगेच ओळखतात आणि तेथे शांतपणे पोहोचतात.’ ही गोष्ट खरी सिद्ध झाली. त्याचप्रमाणे संघाच्या या सात्त्विक कार्याला, हळूहळू का होईना, सामान्य जनतेकडून सातत्याने स्वीकारार्हता आणि समर्थन मिळत आहे.
संघाच्या कार्यारंभापासूनच संपर्क साधलेल्या व नवीन-नवीन सामान्य कुटुंबांकडून संघ कार्यकर्त्यांना आशीर्वाद आणि आश्रय मिळत राहिला. स्वयंसेवकांची कुटुंबेच संघ कार्य चालवण्याचे केंद्रस्थान राहिले. सर्व माता-भगिनींच्या (मातृशक्तीच्या) सहकार्यामुळेच संघ कार्याला पूर्णत्व प्राप्त झाले. दत्तोपंत ठेंगडी किंवा यशवंतराव केळकर, बाळासाहेब देशपांडे तसेच एकनाथ रानडे, दीनदयाळ उपाध्याय किंवा दादासाहेब आपटे यांसारख्या लोकांनी संघ प्रेरणेने समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संघटना उभ्या करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या सर्व संघटना सध्या व्यापक विस्तारासह त्या-त्या क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवून आणण्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत. समाजातील भगिनींमध्ये याच राष्ट्रकार्यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून मौसीजी केळकर यांच्यापासून ते प्रमिलाताई मेढे यांच्यासारख्या मातृसमान व्यक्तींची भूमिका या प्रवासात अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.
संघाने वेळोवेळी राष्ट्रीय हिताचे अनेक विषय उचलून धरले. त्या सर्वांना समाजातील विविध लोकांचे समर्थन मिळाले, ज्यात अनेकदा सार्वजनिक स्तरावर विरोधी दिसणारे लोकही समाविष्ट होते. व्यापक हिंदू हिताच्या मुद्द्यांवर सर्वांचे सहकार्य मिळावे, असाही संघाचा प्रयत्न राहिला आहे. राष्ट्राची एकात्मता, सुरक्षा, सामाजिक सलोखा तसेच लोकशाही आणि धर्म-संस्कृतीच्या रक्षणाच्या कार्यात असंख्य स्वयंसेवकांनी अवर्णनीय कष्टांचा सामना केला आणि शेकडो लोकांनी बलिदानही दिले. या सर्वांमध्ये समाजाच्या बळकट आधाराचा हात नेहमी राहिला आहे.
१९८१ मध्ये तमिळनाडूच्या मीनाक्षीपुरम येथे धर्मांतर करवण्यात आले. या महत्त्वपूर्ण विषयावर हिंदू जनजागरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सुमारे पाच लाख लोकांच्या उपस्थितीतील संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. कर्णसिंह उपस्थित राहिले होते. १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत प्रसिद्ध संन्यासी स्वामी चिन्मयानंद, मास्टर तारा सिंह, जैन मुनी सुशील कुमार जी, बौद्ध भिक्षु कुशोक बकुला आणि नामधारी शीख सद्गुरू जगजीत सिंह यांचा प्रमुख सहभाग होता.
हिंदू शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला कोणतेही स्थान नाही, हे पुन्हा स्थापित करण्याच्या उद्देशाने श्री गुरुजी गोळवलकर यांच्या पुढाकाराने उडुपी येथे आयोजित विश्व हिंदू संमेलनात पूज्य धर्मगुरूंसह सर्व संत-महंतांचे आशीर्वाद आणि उपस्थिती लाभली. ज्याप्रमाणे प्रयाग संमेलनात ‘न हिंदुः पतितो भवेत्’ (कोणताही हिंदू पतित होऊ शकत नाही) हा प्रस्ताव स्वीकारला गेला होता, त्याचप्रमाणे या संमेलनाची घोषणा होती – ‘हिंदवः सोदराः सर्वे’ अर्थात सर्व हिंदू भारत मातेचे पुत्र आहेत. गोहत्या बंदीचा विषय असो वा राम जन्मभूमी अभियान, संतांचे आशीर्वाद संघ स्वयंसेवकांना नेहमी मिळत राहिले आहेत.
स्वातंत्र्यानंतर लगेचच राजकीय कारणांमुळे तत्कालीन सरकारने जेव्हा संघ कार्यावर प्रतिबंध लादला, तेव्हा समाजातील सामान्य लोकांसह अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींनीही विपरीत परिस्थितीत संघाच्या बाजूने उभे राहून या कार्याला बळ दिले. हीच गोष्ट आणीबाणीच्या (आपातकाल) संकटकाळातही अनुभवायला मिळाली. म्हणूनच, इतके अडथळे येऊनही संघाचे कार्य अखंडितपणे सातत्याने पुढे वाढत आहे. या सर्व परिस्थितीत संघ कार्य आणि स्वयंसेवकांना सांभाळण्याची जबाबदारी आमच्या माता-भगिनींनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. या सर्व गोष्टी संघ कार्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.
भविष्यात राष्ट्रसेवेत समाजातील सर्व लोकांचे सहकार्य आणि सहभाग मिळावा यासाठी, संघ स्वयंसेवक शताब्दी वर्षात घरोघरी संपर्क साधून विशेष प्रयत्न करतील. देशभरात मोठ्या शहरांपासून ते दुर्गम गावांपर्यंत सर्व ठिकाणी तसेच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख लक्ष्य राहील. संपूर्ण सज्जन शक्तीच्या समन्वित प्रयत्नांद्वारे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची पुढील वाटचाल सुकर आणि यशस्वी होईल.
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आहेत)