वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, या तुकाराम महाराजांच्या अभंगावर चर्चा सुरू असतानाच हृदयेंद्रला ‘गुरूगीता’ आठवू लागली. त्यानं विचारलं..
हृदयेंद्र – पण गुरुगीतेत भगवान शिव तर म्हणतात की वेद, पुराणं, शास्त्रं सर्वकाही आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रमित करणारे आहेत..
अचलदादा – वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानि च। मंतयंत्रादिविद्याश्च स्मृतिरुच्चाटनादिकम्।। शैवशाक्तागमादिनि अन्यानि विविधानि च। अपभ्रंशकराणीह जीवानां भ्रांतचेतसाम्।।
हृदयेंद्र – म्हणजेच वेद, शास्त्र, इतिहासग्रंथ, मंत्र, यंत्रादि विद्या, स्मृती आदि ग्रंथ, शैव शाक्त आगम निगम आदि पंथ हे आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रांतीत पाडणारे आहेत.. हे जर खरं तर मग वेदांचा अर्थ या भ्रांतीतून मुक्त करणारा असेल का?
अचलदादा – हृदय तुझ्या मनात ही शंका यायला नको, कारण गुरुगीतेवर आपण अनेक रात्री चर्चा केली आहे.. या श्लोकाचा अर्थ वेदापासून सारं काही आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रांतीत पाडणारं आहे, असा असला तरी यात वेदादि ग्रंथ वा पंथांचा दोष नाही! कारण ग्रंथ निव्वळ शाब्दिक अर्थानं आणि धर्म वा पंथ केवळ रूढीगत अनुकरणाच्या अर्थानं पाहिला जातो. त्याचा खरा अर्थ जीवनात कसा रुजवायचा हे सांगणारा साक्षात असावा लागतो. त्याच्या सहवासातच वेदांचा खरा अर्थ, धर्माचं खरं आचरण उमगू लागतं.. त्यामुळे तुकाराम महाराज काय किंवा चोखामेळा महाराज काय, त्याच अर्थानं हे स्पष्ट सांगत आहेत की भगवंताशी तादात्म्य पावलेले जे संत आहेत, त्यांनाच वेदांचा आणि धर्माचा खरा गाभा उकलतो..
बुवा – बरोबर! म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं। भार धन नाही मजुरीचे।।’’ यापुढे ते काय सांगतात? तर, ‘‘उत्त्पत्ति पाळण संहाराचे निज। जेणें नेलें बीज त्याचे हातीं।। तुका म्हणे आम्हां सांपडलें मूळ। आपणचि फळ आलें हातां।।’’ फार विलक्षण आहे बरं हे! उत्त्पत्ति, पालन आणि संहार! अवघी सृष्टी या तीन गोष्टींवर आहे.. प्रत्येक व्यक्तीची, प्राणीमात्राची, प्रत्येक वस्तुमात्राची उत्त्पत्ति होते.. तिचं पालन होतं, पोषण होतं, सांभाळ होतो आणि तिची घट होते, झीज होते, नाश होतो.. उत्त्पत्ति ही आनंदाची आणि नाश हा क्लेशकारक वाटतो, पण नाशातच नव्या उत्त्पत्तिचं बीज असतं ना? जीवनाचं हे रहस्य केवळ संतांनाच उमगतं. जीवन हे खेळासारखं कसं आहे, हे त्यांनाच समजतं. विष्णुदास नामांचा एक अभंग आहे पहा..
हृदयेंद्र – म्हणजे नामदेव महाराजांचाच ना?
बुवा – नाही! विष्णुदास नामा अगदी वेगळे आहेत! हे नाथकालीन संतकवि आहेत.. ‘रात्र काळी घागर काळी’सारखे त्यांचे अनेक अभंग रसाळ आहेत..
हृदयेंद्र – हो आरतीतही आहे.. विष्णुदास नामा जिवेभावे ओवाळी..
बुवा – तर त्यांचा एक अभंग आहे, ‘‘यारे नाचू प्रेमानंदे, विठ्ठल नामाचिया छंदे।।’’ त्यात ते शेवटच्या दोन चरणांत म्हणतात, ‘‘आता राऊळासी जाता। झाली जिवाची मुक्तता।। विष्णुदास नामा म्हणे। आता नाही येणे जाणे।।’’ राऊळ म्हणजे देऊळ.. या देहरूपी देवळातल्या आत्मारामाचं दर्शन ज्याला झालं तोच जीवभावातून मुक्त झाला! तोच गाभाऱ्यात गेला.. त्यालाच जीवन आणि मृत्यू, मृत्यू आणि जीवन ही साखळी अव्याहत कशी सुरू आहे, हे समजतं.. त्याच्याच अंतरंगातून येण्या-जाण्याचं चक्र लोप पावतं.. तेव्हा उत्त्पत्ति, पालन आणि नाश हे तीन वेगवेगळं उरतच नाही.. हे खरं ज्ञान ज्याच्या अनुभवात उतरतं, ज्याला हे निजज्ञान होतं त्याच्या हाती बीज येतं! तुकाराम महाराज काय सांगतात? ‘‘उत्त्पत्ति पाळण संहाराचे निज। जेणें नेलें बीज त्याचे हातीं।।’’ हे बीज काय आहे हो? बीजातूनच वृक्ष निर्माण होतो ना? एका लहानशा बीजातच एक मोठा वृक्ष सामावला असतो ना? तर असं चर आणि अचराचं, व्यक्त-अव्यक्ताचं, आकार-निराकाराचं बीज असलेलं नाम आम्हाला गवसलं! गुरूप्रदत्त नामालाच बीजमंत्र म्हणतात ना?
हृदयेंद्र – (रोमांचित होत) वा! पण बुवा, आधी उत्त्पत्ति पाळण संहाराचं निज ज्ञान होऊन मग नाम गवसलं की आधी नाम मिळाल्यानं ते निजज्ञान झालं?
बुवा – वा! हा अगदी बीजप्रश्न आहे खरा!!
चैतन्य प्रेम