पराकोटीचे अंतर्मुख बनून अंत:करणाचा पापुद्रा आणि पापुद्रा उलगडून तपासत त्यांत दडलेले ‘स्व’च्या जाणिवेचे अंश निर्ममपणे निवडून काढण्याच्या प्रक्रियेचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे तुकोबारायांचे जीवन. एका पातळीवर जवळचे आणि अनुकरणीय सुहृद वाटणारे तुकोबा नेमक्या याचबाबतीत तितकेच अननुकरणीय आणि दूरस्थ भासू लागतात. अध्यात्माची परिभाषा आत्मसात होणे आणि तिच्या परिवेषात अवगुंठित असा शब्दांच्या अतीत असणारा अनुभव हस्तगत होणे, या दोन फार निराळ्या बाबी होत याचा पुरेपूर अंदाज, अंमळ आस्थेवाईकपणे तुकोबांच्या गाथ्याशी सलगी केली की आपल्याला येऊ लागतो. चार पुस्तके वाचली की पारमार्थिक संज्ञा-संकल्पना जिभेवर सहज रुळतात. स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले असेल आणि निसर्गत:च कथनशैली गाठीशी असेल तर विद्वत्ताप्रचुुर कीर्तन-प्रवचने सादर करून सर्वसामान्यांवर चांगल्यापैकी ‘छाप’ही पाडता येते. आपणही आता आध्यात्मिक झालो अथवा परमार्थाच्या पथावर आपली आता बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे, अशा समजाचा पगडाही हळूहळू मग घट्ट व्हायला लागतो. अशा त्या पर्वादरम्यान, अवचितच, शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान। दरपणीचें धन उपर वाया। अनुभव कइं होईन भोगिता। सांकडें तें आतां हें चि आलें। हे तुकोबांचे वचन पुढ्यात अवतरते आणि आपल्या बोलघेवड्या तथाकथित परमार्थाच्या फुगलेल्या फुग्याला टाचणी लागून तो जमिनीवर येतो. वरपंग अध्यात्म आणि आध्यात्मिक मूल्यांची आंतरिक अनुभूती या दोहोंत प्रचंड अंतर असते हे टोकदार वास्तवही आपल्या मनावर बिंबवतात तुकोबाच. बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग। नाहीं जाला त्याग अंतरींचा। ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा। मनासी हा ठावा समाचार। हे तुकोबांचे रोखठोक कथन दाखवून देते आपली जागा आपल्याला अतिशय नेमकेपणाने. तुकोबांकडून शिकायचे ते हेच व असे कठोर, वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण आणि आत्मशोधन. कीर्तन-प्रवचनादी उपक्रमांदरम्यान, आध्यात्मिक शिबिरांमध्ये, व्रतवैकल्ये चालू असताना तेवढ्यापुरते आपले रागलोभ आटोक्यात राखणे जमतेही आपल्याला. परंतु रागद्वेषांनी त्यांचे ठाण आपल्या अंत:वृत्तींमधून कायमचे उठवले आहे का, हे तपासायला गेले तर बहुतेकदा आपल्या पदरी येते घनघोर निराशाच. तुकोबांसारखी अविरत आणि कसोशीने जारी राखलेली डोळस आत्मचिकित्सा आपल्या अंगवळणी पडलेली नसते हेच याचे कारण. काम क्रोध माझे जीताती शरीरीं। कोवळें तें वरी बोलतसें। कैसा सरतां जालों तुझ्या पायीं। पांडुरंगा कांहीं न कळे हें। इतका निरपवाद कबुलीजबाब, तोही प्रगटपणे देण्याचे तुकोबांच्या ठायी वसणारे अचाट बळ त्याच्या शतांशाने तरी आपल्यापाशी सापडेल का? अध्यात्माचेही राहू देत एक वेळ, लौकिकातील आपली नोकरी तरी आपण प्रामाणिकपणे करतो का? मिळणाऱ्या वेतनाच्या प्रत्येक रुपयाला न्याय देईल, असे व इतके काम दररोज आपण रुजू करतो किंवा नाही हे तरी आपण दक्षपणे जोखतो का? चाकरीवांचून। खाणें अनुचित वेतन। असे खडसावणारे तुकोबा आम्हांला पचणे शक्यच नाही त्यांमुळे. संतवचनांचा आणि संतप्रणीत मूल्यांचा वारसा जपायचा म्हणजे ऊठसूट संतांची उद्धृते बोलण्यामध्ये पेरत बोलक्या अध्यात्माचा बडिवार माजवणे नव्हे, हे वर्म उमजेल त्या दिवशी अद्वयबोधाचा दारवंटा यावा आपल्या नजरेच्या टप्प्यात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By becoming the ultimate introvert assimilate the definition uncovered in the environment akp
First published on: 24-12-2021 at 00:05 IST