नवव्याख्या

नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र वैरी कुळी आम्हां हे बहेणाईंचे उद्गार त्याच वस्तुस्थितीचे अधोरेखन होय.

‘जाब विचारणे’ आणि ‘प्रश्न उपस्थित करणे’ या दोहोंत फार फरक आहे. जाबजबाबाद्वारे वाढतात वादविवाद. तर मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याने व्यक्तिगत तसेच व्यापक सार्वजनिक स्तरावर समाजमनही बनते अंतर्मुख. समकालीन समाजमानसाला तसे बनविण्यामध्ये बहेणाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचे सामर्थ्य एकवटलेले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तब्बल ३० वर्षे वयाच्या बिजवराशी लग्न लावून दिले जाण्यापासून ते जाणतेपणी प्रचंड संशयी, मत्सरग्रस्त नवऱ्याने बदडून काढण्यापर्यंत पुरुषी अहंकाराचे सारे रंगढंग बहेणाबाईंनी अनुभवले. वयातील अंतराप्रमाणेच बहेणाबाई आणि त्यांचे पतिराज या दोहोंदरम्यान मानसिक-भावनिक अंतरही होते दुर्लंघ्यच. बहेणाबाई, उपजतच ‘देवलसी’ कोटीतील. तर त्यांचा नवरा पराकोटीचा कर्मठ वैदिक. कर्मकांडप्रधान धर्मकृत्यांवरच उपजीविका असल्यामुळे, एकाकी भक्तीद्वारे परतत्त्वाशी एकरूप होता येत असल्याने देव आणि भक्तादरम्यान मध्यस्थाची अनिवार्यता अप्रस्तुतच ठरते, असा भक्तिबोध प्रसृत करणारे गीताशास्त्राचे तत्त्वज्ञान हा त्याच्या नफरतीचा विषय बनावा, यांत अतक्र्य असे काहीच नाही. नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र वैरी कुळी आम्हां हे बहेणाईंचे उद्गार त्याच वस्तुस्थितीचे अधोरेखन होय. नामचिंतनासारखे कर्माशी पूर्ण अविरोध असणारे सुलभ, सर्वसमावेशक साधन भागवतधर्माने सर्व समाजस्तरांतील मुमुक्षूंना उपलब्ध करून दिल्याने पारमार्थिक श्रेयसाची उपासना करण्याच्या तेथवरच्या यच्चयावत कर्मकांडप्रवण साधनविधींची मातबरी संपुष्टात आली. नामसाधनेद्वारे हस्तगत होणाऱ्या लखलखीत आत्मप्रचीतीद्वारे तेजस्वी आत्मभान प्राप्त झालेल्या बहेणाई, मग, बुरसटलेल्या अशा तत्कालीन पुरुषप्रधान व्यवस्थेच्या पुढ्यात वेद हाका देती पुराणें गर्जती। स्त्रियेच्या संगती हित नोहे। मी तो सहज स्त्रियेचाचि देह। परमार्थाची सोय आता कैंची असा परखड सवाल करतात. त्यांच्या या नितळ प्रश्नामध्ये अपरंपार ताकद आहे ती रूढीग्रस्त समाजमनाला अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची. पारमार्थिक साधनेद्वारे व्यक्तीच्या लौकिक जीवनरहाटीमध्ये जे गुणात्मक परिवर्तन अपेक्षित आहे, त्याचा हा निरपवाद पुरावा ठरावा. निबर समाजमनाला हलवून सोडणारे असे प्रश्न उपस्थित करण्यास विलक्षण आंतरिक बळ लागते. आध्यात्मिक साधनेच्या व्यावहारिक उपयोजनाचा तो ठरतो कवडसा. बहेणाईंसारख्या उच्चकुलीन साधकाने तुकोबांसारख्या तथाकथित कनिष्ठ वर्णातील सत्पुरुषाकडून अनुग्रह घ्यावा यांबद्दल समकालीन मुखंडांनी रान पेटविले. त्या आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीमध्ये घडवून आणत ब्राह्मण्याची एक नवव्याख्याच अंतर्बाह्य एक अखंड अद्वय। प्रत्यक्ष अप्रमेय अनुभवे। तयासीच जाण म्हणावे ब्राह्मण। जयाचें निर्वाण परब्राह्मी सिद्ध करतात बहेणाई! ब्राह्मण आणि त्यांचे ब्राह्मण्य यांची सांगड बहेणाई अद्वयबोधाशी घालतात, हे इथे अधोरेखित करावयास हवे. इतकेच नाही तर, सर्वही व्यापार तुकोबाचे हरी। आपणची करी अद्वयत्वे अशा अलौकिक शब्दांत तुकोबांचा अंतरंग अधिकार विदित करत, ब्राह्मण्याच्या वास्तव निकषाला समकालीन ब्राह्मवृंद अणुमात्रही उतरत नसल्यानेच अद्वयबोधावर स्थिर असलेल्या तुकोबांचे माहात्म्य त्यांना उलगडणे शक्य नसल्याचे सूचित करत बहेणाई कर्मकांडरत ब्राह्मकुलोत्पन्नांच्या पदरात त्यांचे यथोचित माप यथास्थित घालतात.    

– अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Introverted to contemporary society the power of activism akp

Next Story
कर्म-विधि
फोटो गॅलरी