अभय टिळक
निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे जणू सारसर्वस्वच. ज्ञानदेव व त्यांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ यांच्यातील मधुर नात्याचे अनंत कवडसे ज्ञानदेवांच्या उद्गारांत ठायी ठायी आढळतात. आई-वडिलांच्या पश्चात धाकटय़ा भावंडांचा सर्वतोपरी सांभाळ केला निवृत्तिनाथांनीच. तथापि खुद्द निवृत्तिनाथांसंदर्भात फारसा तपशील कोठे आढळत नाही. त्यांची अभंगकळादेखील मोजकीच. मात्र, अभंगांत प्रतिबिंबित होणारी अनुभूतीची लांबी-रुंदी-खोली अचाट. अद्वयानंदाचा बोध निवृत्तिनाथांना लाभला त्यांचे सद्गुरू गहिनीनाथांकडून. अद्वयानंदाचे सारे तत्त्ववैभव निवृत्तिनाथांच्या ठिकाणी किती व कसे सखोल मुरले, बिंबले होते याची प्रचीती ‘विभाचा विभास विभरू पाधीश। सर्वत्र महेश एकरूप’ या त्यांच्या उद्गारांत पुरेपूर येते. निवृत्तिनाथांना त्यांच्या सद्गुरूंकडून आणखी एक वसाही मिळाला, तो म्हणजे कृष्णभक्तीचा. ‘निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण। कुळ हें पावन कृष्णनामें’ अशा शब्दांत निवृत्तिनाथ या ठेव्याचे वर्णन करतात. शिव आणि विष्णू या दोन तत्त्वांच्या उपासनांचा मनोहर संगम या भूमीत घडून आला तो गहिनीनाथांच्या माध्यमातून. शिवोपासक नाथपंथाच्या उपासनाप्रवाहामध्ये कृष्णभक्तीचा प्रवाह त्यांद्वारे सहजच एकरूप बनून गेला. गोपवेष धारण करत गोकुळात गोधन चारणाऱ्या बालकृष्णावताराचे ‘भूतग्रामींचा परेशू। तापत्रयाचा करीं नाशू। आड धरूनी गोपवेषु। वत्स राखें’ असे ज्ञानदेवांनी जे रूपवर्णन केले आहे ते शिव व कृष्ण या दोन तत्त्वांच्या पूर्ण समरूपतेची साक्ष पुरविणारे आहे. निवृत्तिनाथांपासून निळोबारायांपर्यंत सर्वत्र हा संगम खळाळताना अनुभवास येतो. गहिनीनाथांकडून मिळालेले कृष्णोपासनेचे संचित पुढे अधिक परिपुष्ट करणाऱ्या निवृत्तिनाथांनी कृष्णभक्तीच्या उपासनाविभाला दीक्षा दिली ती मुख्यत्वे बालकृष्णभक्तीची. हाच वारसा शतगुणांनी समृद्ध केला पुढे नामदेवरायांनी.
एकल असणारे परमशिव हे अंतिम तत्त्व जगात एकरूपत्वाने व्यापून उरले असेल तर देव आणि त्याची उपासना करणारा भक्त यांच्या नात्याची मांडणी आणि या दोन परस्परसापेक्ष तत्त्वांच्या पृथक अस्तित्वाचा उलगडा कसा करून घ्यायचा, असा कळीचा मुद्दा मग उत्पन्न होतो. या अतिशय विचक्षण शंकेचे निरसन निवृत्तिनाथ ‘आपणचि देव आपणचि भक्त’ असे मार्मिक उत्तर देऊन करतात. अद्वयदर्शनाच्या प्रांतातील भक्तीचे सारे वैशिष्टय़ निवृत्तिनाथांच्या या कथनात ओतप्रोत उतरले आहे. सर्वत्र विलसन परमशिवाचेच असल्याने ‘देव’ व ‘भक्त’ या दोन्ही भूमिका तोच वठवत असतो, हा अद्वयबोधाचा गाभासिद्धान्त. ‘सर्व परिपूर्ण भरलेंसे अखंड। त्यामाजि ब्रह्मांड अनंत कोटि’ या शब्दांत निवृत्तिनाथ त्यांच्या ठायीच्या अद्वयदृष्टीद्वारे त्यांना प्रतीत होणाऱ्या जगाचे स्वरूप मांडतात. या विभात एक शिवतत्त्वच अंतर्बाह्य़ भरलेले असेल तर देव कोण आणि त्याची भक्ती करणारा माझ्यासारखा एखादा भक्त तरी त्याच्यासापेक्ष वेगळा कसा संभवतो, असा प्रश्न खुद्द ज्ञानदेवांनाही पडला असावा. या वस्तुस्थितीचे सूचन आपल्याला घडते ते ज्ञानदेवांच्या एका अभंगात. हा अभंग म्हणजे वस्तुत: त्यांच्या आणि निवृत्तिनाथांच्या संवादाचे शब्दरूप. ज्ञानदेवांच्या प्रश्नाला निवृत्तिनाथ- ‘तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव। फिटला संदेह अन्य तत्त्वीं’ असे नि:संदिग्ध उत्तर देतात. अन्य कोणताही पदार्थ जगात मुदलातच नसल्यामुळे ‘देव’ आणि ‘भक्त’ हा वस्तुत: एकाच तत्त्वाचा आविष्कार होय, याबद्दल कोणताही संदेह कोणीच बाळगू नये, हेच ज्ञानदेवांच्या निमित्ताने निवृत्तिनाथ सांगत आहेत आपल्याला.
agtilak@gmail.com