– अभय टिळक agtilak@gmail.com

‘अल्पज्ञात’ हे वर्णनही बहेणाबाईंच्या संदर्भात अपुरेच ठरावे! त्याच्या जोडीनेच ‘अ-लक्षित’ हे  विशेषण जोडले तरच काळाच्या ओघात, बहेणाबाईंच्या विस्मरणाचे काही अंशी तरी यथार्थ वर्णन करता येईल. देहूमध्ये तुकोबा विद्यमान असताना त्यांच्या दर्शनाचा लाभ झालेल्या मोजक्या शिष्यवरांमध्ये बहेणाबाईंचा समावेश होतो. तुकोबांची भेट घडण्यापूर्वी आणि नंतरही घरच्या आणि बाहेरच्यांकडून त्यांनी अपरंपार छळ आणि दुस्वास सहन केला. केवळ अ-साधारण असेच व्यक्तित्व आणि कर्तृत्व बहेणाबाईंचे. मात्र, या देदीप्यमान विभूतीचा आजमितीस पडलेला विसर इतका गहन की ‘बहेणाबाई शिऊरकर’ नामक तुकोबांची शिष्या आणि ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ या दोन पूर्णपणे निराळ्या व्यक्तिरेखा होत, याचाही पत्ता नसतो कित्येकांना. इ.स. १६२८ ते इ. स. १७०० असे ७२ वर्षांचे बहेणाबाईंचे जीवनमान. शिवपुत्र छत्रपती राजाराममहाराजांचे देहावसान झाले त्याच वर्षी त्या समाधिस्थ झाल्या. छत्रपती शिवरायांच्या पश्चात महाराष्ट्रामध्ये उतरलेल्या औरंगजेबाची सगळी कारकीर्द बहेणाबाईंनी बघितली. अचाट, अतक्र्य घटनांनी गजबजलेला जीवनक्रम त्यांचा. लौकिक जीवन जितके खडतर तितकाच दुस्तर आध्यात्मिक प्रवासही. तुकोबांप्रमाणेच एकाकी, विशुद्ध आत्मप्रेरणेने भारित आणि निखळ आत्मबळाच्या प्रेरणेवर परिपूर्तीस गेलेला. ज्ञानदेवप्रणीत अद्वयदर्शनाचे स्पष्ट कवडसे बहेणाईंच्या अभंगसंपदेमध्ये अनेक ठिकाणी उमलतात. एकपणे होते अनेक जाले। पाहाता विभाकार विस्तारले। वटबीजन्याये कैसे विरु ढले। सर्व होउनी ठेले माझी मीच। हे बहेणाबाईंचे अनुभूतीसंपन्न रसरशीत उद्गार म्हणजे त्या वास्तवाचा रोकडा दाखलाच. अद्वयबोधाचा हा गाभा आपल्याला थेट तुकोबारायांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कृपेने हस्तगत झाला असा निरपवाद निर्वाळा बहेणी म्हणे तेणे अहंपण माझे। संसारदु:ख उतरिले ओझे। तुकाराम भेटला धन्य जिणे माझे। कृतकृत्य जाले। अशा शब्दांत देतात बहेणाबाई. प्रपंचाकडे बघण्याची बहेणाबाईंची दृष्टी अद्वयाच्या संस्कारांनी सिंचित बनावी यांत, म्हणूनच, अ-स्वाभाविक काहीच नाही. संसारात प्रापंचिक जबाबदाऱ्या पडणारच.  पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा असलेल्या आपल्या व्यवस्थेमध्ये तर घरधनीण कायमच कामाच्या डोंगराखाली दबलेली. आध्यात्मिक श्रेयसाच्या प्राप्तीसाठी स्वतंत्र साधना वगैरे काही करण्यास वेळ व शक्ती तिच्यापाशी शिल्लक राहणे, हे तर निव्वळ असंभवच. कुटुंबाच्या सेवेसाठी अहोरात्र वाहून घेणे हेच तिच्या ‘पातिव्रत्या’चे गाभालक्षण, या विचाराचा पगडा असलेला तो काळ. रोजच्या आयुष्यातील नित्यनैमित्तिक कामे हीच पूजासामग्री गणत विश्वात्मक सर्वेश्वराचे पूजन करण्याची भागवतधर्मप्रणीत हातोटी बहेणाबाईंनी जीवनभर निष्ठेने जोपासली. किंबहुना, कर्म तेचि बह्म ब्रह्म तेचि कर्म। ऐसे जिने वर्म जाणितले। अशा शब्दांत ‘पतिव्रता’ या संकल्पनेची पारंपरिक व्याख्या आमूलाग्र बदलत पातिव्रत्याला पूर्वापार लगडलेली सारी संकुचित अर्थटरफले बहेणाबाई प्रगल्भपणे दूर करतात. ‘ब्रह्म’ या संज्ञेचा एक अर्थ होय ‘कर्म’ अथवा ‘मेहनत’. ‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ याच रामरगाडय़ात जन्मभर झिजणाऱ्या तत्कालीन समस्त स्त्रीवर्गाच्या संसारकृत्यांना ब्रह्मोपासनेची प्रतिष्ठा बहाल करत स्त्रीमुक्तीच्या पर्वाची पायाभरणीच करतात बहेणाबाई जणू एक प्रकारे.