अभय टिळक agtilak@gmail.com
कान्होबाराय म्हणजे तुकोबांचे धाकटे बंधू. तीनही भावांमध्ये वयाने सगळ्यांत लहान. बोल्होबा आणि कनकाई या दंपतीला सावजी, तुकोबा आणि कान्होबा अशी तीन अपत्ये. तिघेही मनस्वी साधक. सर्वात थोरले सावजी हे तर उपजतच विरक्त. लौकिकातील संसारही त्यांनी जवळपास केलाच नाही. पत्नीच्या देहावसानानंतर घरादाराचा त्याग करून ईश्वरोपासनेसाठी विजनवास पत्करला सावजींनी. भगवद्भक्त तुकोबा आणि कान्होबा या भावाच्या वयात नेमके अंतर किती याचा नाही लागत पत्ता. कान्होबांविषयी फारसा तपशील उपलब्धच होत नाही. तुकोबारायांच्या गाथेमध्ये ‘नाट’ या नावाचे अभंगांचे प्रकरण आहे त्यांत सात अभंग सापडतात कान्होबांचे. संख्येने अत्यल्प असली तरी कान्होबारायांची अभंगवाणी स्वतंत्र आहे. तिला तिची म्हणून अशी एक स्वायत्त आत्मखूण आहे. तुकोबांवरील नि:सीम प्रेमभक्तीपायी कान्होबारायांनी त्यांच्या अभंगांत ‘तुकयाबंधू’ हीच आपली नामखूण नोंदविलेली दिसते. तुकोबांवरील त्यांच्या अथांग प्रेमाची पुरेपूर प्रचीती आपल्याला येते ती तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर कान्होबांच्या अंत:करणातील आकांत शब्दरूपाने प्रगट झालेल्या त्यांच्या एका मनस्वी अभंगात. ‘वासुदेव’ या रूपकात्मक अभंग प्रकारात कान्होबांचा असाच एक नितांत सुंदर आणि तितकाच विलक्षण प्रगल्भ असा अभंग आहे. ‘देह’पुरीमध्ये राज्य करणाऱ्या ‘मनु’राजाचे मोठे मनोज्ञ चित्र चितारतात कान्होबा या अभंगात. या ‘मनु’नामक राजाला ‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ अशा दोन भार्या होत, इथपासून कान्होबाराय मांडतात त्याचे वर्णन. या मनुराजाने कृपा केल्यामुळे जीवनामध्ये उचित असे मार्गदर्शन लाभून आयुष्याची वाटचाल मोठी अर्थपूर्ण व सुफल झाली, असे कृतार्थतेचे उद्गार काढत असताना ती सारी प्रक्रिया नेमकी कशी होती, याचे कान्होबांनी अभंगात सादर केलेले विवरण कमालीचे आशयघन होय. माझा जीवनप्रवास सिद्धपंथाने सिद्धीस गेला त्याचे कारण, पुढें भक्तीनें धरिलें हातीं। मागें ज्ञान वैराग्य धर्म येती। स्थिर केलीं जीं आचपळें होतीं। सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा अशा पराकोटीच्या अन्वर्थक शब्दकळेद्वारे विशद करतात कान्होबाराय. तुकोबारायांच्या अनुभूतीशी असणारे कान्होबांचे प्रगाढ ऐक्य त्यांचे हे कथन प्रगट करते कारण, एका सगुणभक्तीची कास धरली की अन्य साधनांची प्राप्ती आपसूकच होते असा आपला स्वानुभव तुकोबांनीही अवघ्या दशा येणें साधती। मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटें हृदयींची मूर्ती। भावशुद्धि जाणोनियां अशा प्रत्ययकारी शब्दांत मांडलेला आहे त्यांच्या एका ‘नाटा’मध्ये. एका भक्तिसाधनेचा अवलंब मनोभावे केला की ज्ञान, वैराग्य, धर्म आणि योग या अवघ्या अवस्था (दशा) मागोमाग अनुसरतात असे सांगत तुकोबांच्या कथनाचे मर्म आपल्या पुढय़ात उलगडून मांडते कान्होबांची अनुभवसिद्ध वाणी. तुकोबा-कान्होबांचे हे कथन नितांत मार्मिक ठरते ते ज्ञान (बोध) आणि भक्ती या दोहोंदरम्यान नांदणारे आई आणि लेकराचे नाते हळुवारपणे उलगडण्यामुळे. ज्ञानरूपी लेकराचा जन्म भक्तीरूपी मातेच्या पोटी होत असल्याने लेकराने आईच्या मागे धावावे हे ओघानेच येते. त्यामुळे, मातेची उपासना आरंभल्यानंतर तिच्या बाळाला रिझवण्यासाठी वेगळे प्रयास करण्याचे कारणच उरत नाही. बाळ मातेकडे झेपावते त्याच न्यायाने ज्ञानही विसावते भक्तीपाशी. ज्ञानोत्तर भक्तीचा प्रश्न मग येतोच कोठे?
