नमन

एकाच चैतन्याच्या ‘गुरू’ आणि ‘शिष्य’ अशा दोन पृथक आविष्कारांचे परस्परसामरस्य म्हणजेच ‘नमन’!

अभय टिळक agtilak@gmail.com
व्यक्तींप्रमाणेच ग्रंथांशीदेखील नाते जुळावे लागते. व्यवहारात काही लोकांशी आपली गट्टी घट्ट आणि झट्दिशी जमून जाते. उलटपक्षी, काही माणसांपासून दूर राहणेच पसंत करतो आपण. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ या दोन ग्रंथांबाबतीत नेमके असेच काहीतरी घडते. दुबरेधतेचा शिक्का चिकटलेला असल्याने ‘अमृतानुभव’च्या वाटेला फारसे जातच नाही कोणी. त्यातच, ‘अमृतानुभव’च्या प्रारंभीच पाच संस्कृत श्लोक नजरेस पडले की, हा संपूर्ण ग्रंथच संस्कृत भाषेत ज्ञानदेवांनी लिहिलेला असावा, असा समजदेखील काहींचा होतो. यातील रमणीय बाब अशी की, ग्रंथाच्या सुरुवातीस संस्कृतात असणाऱ्या पाच श्लोकांचा गाभाच जणू ज्ञानदेवांनी प्राकृतातील ओव्यांद्वारे ग्रंथाच्या अंतरंगात विस्तारलेला आहे. या पाच श्लोकांमधील दुसरा श्लोक मोठा बहारदार आहे. ‘‘गुरु रित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शांकरी। जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्र्रायै निरन्तरम्।’’ अशा शब्दांत ‘गुरू’ या पदाला वंदन करत असतानाच, ‘गुरू’ या अधिष्ठानाची अपूर्व अशी एक व्याख्याही तिथे केलेली दिसते ज्ञानदेवांनी. तृप्त करणारे शैवागमाचे तत्त्वज्ञानच (शांकरी विद्या) या जगात ‘गुरू’ या अभिधानाने ओळखले जाते. तेव्हा, अशा त्या सर्वश्रेष्ठ व निरन्तर ज्ञानमय श्रीगुरूंना वंदन असो, हा भाव व्यक्त करतो ज्ञानदेवांचा हा संस्कृत श्लोक. आहे की नाही मोठी मजा! ‘गुरू’ या अधिष्ठानाला पूर्णपणे अशारीर असे अस्तित्व कल्पितात अथवा बहाल करतात ज्ञानदेव या ठिकाणी. अशा या असाधारण अस्तित्वाला नमन करण्याची परीही तितकीच असामान्य असली पाहिजे, हे ओघानेच आले. ‘‘दर्पणाचेनि त्यागे। प्रतिबिंब बिंबी रिगे। कां बुडी दीजे तरंगे। वायुचा ठेला।’’ अशा मोठय़ा विलक्षण शब्दांत नमनाची ती रीत विशद करतात ज्ञानदेव ‘अमृतानुभव’च्या पहिल्या प्रकरणामध्ये. पूर्ण ऐक्य, प्रगाढ सामरस्य अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना ‘नमन’ या संज्ञा-संकल्पनेद्वारे. ‘नमन’ या संकल्पनेद्वारे आपल्याला जे सूचित करावयाचे आहे त्याच्या स्पष्टीकरणासाठी दोन दृष्टान्त योजतात ज्ञानदेव. आरशासमोर उभे राहिले की आपले प्रतिबिंब दिसते आपल्याला आरशात. आता, पुढय़ातून आरसा दूर केला की, प्रतिबिंब आणि बिंब या दोहोंचाही घडून येतो विलय आपसूकच. तीच बाब पाण्याच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या तरंगांची. वाऱ्याची झुळूक आली की तलावातील पाण्यावर लाटा उठतात. मात्र, वारा निवांत झाला की तरंगही जलसाठय़ाशी एकरूप होतात. सद्गुरूंना वंदन करावयास प्रवर्तित झालेल्या शिष्याचे अंतिमत: असेच सामरस्य अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना ‘नमन’ या संकल्पनेद्वारे. नमस्कार करणे ही या ठिकाणी केवळ शारीर पातळीवरील कृती अपेक्षितच नव्हे. ‘नमन’ म्हणजे ‘शिष्य’नामक पृथक अस्तित्वाचा समूळ विलय. आता, यासाठीसुद्धा शिष्याला काहीच सायास करावे लागत नाहीत, असे आहे त्यापुढे प्रतिपादन ज्ञानदेवांचे. ‘‘नाना बिंबपणासरिसे। घेऊ नि प्रतिबिंब नासे। नेले वंद्यत्व येणे तैसे। वंदितेनसी।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात ‘गुरू’ या अधिष्ठानाचे अतुलनीय सामर्थ्य आणि अगाध महिमान. आरशासमोरून आपण हललो की आरशातील आपले प्रतिबिंबही विरून जाते. अगदी याच न्यायाने, नमन करण्यासाठी पुढय़ात उभ्या ठाकलेल्या शिष्यवराला सद्गुरू स्वत:मध्ये सामावून घेतात, असा आहे ज्ञानदेवांचा दाखला. एकाच चैतन्याच्या ‘गुरू’ आणि ‘शिष्य’ अशा दोन पृथक आविष्कारांचे परस्परसामरस्य म्हणजेच ‘नमन’!

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta advayabodh article illustrations god of knowledge zws

Next Story
गाभारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी