अभय टिळक agtilak@gmail.com

‘दास’ ही संज्ञा-संकल्पना मोठी वैशिष्टय़पूर्ण होय. या संज्ञेला लाभलेल्या अर्थातराच्या पदरोपदरांचा पैस ‘गुलाम’ ते ‘भगवद्भक्त’ असा चांगला औरसचौरस विस्तारलेला दिसतो आपल्याला शब्दकोशात. ‘‘धन्याने सांगितलेली सर्व कामे इमानेइतबारे बिनतक्रार करणारा आणि ज्याचे सुखदु:ख सर्वतोपरी धन्याच्या मेहेरबानीवर निर्भर आहे असा माणूस म्हणजे दास’’, असा गोषवारा अर्थाच्या त्या अवघ्या संभाराद्वारे निष्पन्न होतो. ‘संपूर्ण समर्पण’ हा ठरतो, मग, ‘दास’ या शब्दाचा गाभा. देह तुझ्या पायीं। ठेवुनि जालों उतराई। आतां माझ्या जीवा। करणें तें करीं देवा हे तुकोबांचे उद्गार प्रगट करतात दास्यभक्तीचा जणू अर्कच. याला लागते फार मोठी ताकद. असे निरपवाद आत्मविलोपन नसते अजिबातच सोपे. ‘स्व’ची जाणीव पूर्णत: विलीन करून आपल्या जगण्याचा सगळा भार सर्वस्वे स्वामीवर निरवून निरुपाधिक राहणे, हे अतिशय दुर्धर. तुका म्हणे ठेवी तैसें। आम्ही राहों त्याचे इच्छे ही जगण्याची परी केवळ एकटे तुकोबाच जाणोत आणि निभवून नेवोत! या कोटीतील दास्यत्व उभयदिश असते. दास आणि स्वामीचे हे नाते असते मोठे वैशिष्टय़पूर्ण असेच. ‘स्व’चा विलय घडवून आणत ज्याप्रमाणे भक्त अथवा साधक त्याच्या आराध्याला संपूर्णतया शरण जात असतो, त्याच वेळी त्या तशा एकविध निष्ठेच्या बळावर तो त्याच्या स्वामीलादेखील एक प्रकारे आपला अंकित करून घेत असतो. दास्यभक्तीचे हे मोठे अमोघ बळ. ज्ञानदेव, नाथराय आणि तुकोबा या तिघांच्याही ‘पाइकी’च्या अभंगांत या नात्याचे निरनिराळे आयाम पुढय़ात अवतरतात आपल्या. ज्ञानदेव, नाथराय आणि तुकोबा या तीन विभूतींचा मुळात भिन्न असणारा मन:पिंड आणि त्यांना लाभलेली त्या त्या काळाची अशी विशिष्ट पार्श्वचौकट यांच्या छटा ‘पाइकी’च्या त्यांच्या अभंगांत पृथकपणे उमटाव्यात हे स्वाभाविकच होय. मात्र, पराकोटीचा लढाऊपणा आणि झुंजार बाणा या दोन गुणांचे दर्शन त्या सगळ्याच अभंगांत घडते आपल्याला. ज्ञानदेवांचा ‘पाईक’ आणि त्याचे स्वामीशी असलेले नाते याला कोंदण लाभलेले दिसते ते निखळ अद्वयदर्शनाचे. कुडीवर उदार झाल्याखेरीज स्वामीचा ठाव पुसता येत नसल्याने नि:संग होऊन जिवाची बाजी लावण्यात साठवलेले असते ‘पाइकी’चे सारे वर्म. देह दंडुनि पाईक अनुसरला जीवें। तव स्वामियाचें गूज हातासि आलें हे ज्ञानदेवांचे या संदर्भातील कथन अतिशय नेमके आणि स्पष्ट आहे. मात्र, एकदा का स्वामित्वाचे गूज पाइकाला उमगले की गळून पडते द्वंद्व-द्वैताचे सारे भान आणि बंधन. स्वामी कोण आणि त्याच्या सापेक्ष असणारा पाईक कोण, हेच येईनासे होते ओळखू. एकच एक तत्त्व ‘स्वामी’ आणि ‘पाईक’ अशा दोन रूपांनी नटून विलसत होते, ही अंतिम अनुभूती पाईक काय स्वामी स्वामिया काय पाईक। असतां एके एक दोन्ही नव्हती अशा अननुभूत शब्दकळेने नटवतात ज्ञानदेव. मात्र, ‘पाईक’ आणि ‘स्वामी’ या नात्यातील गोडवा चाखण्यासाठी त्या अद्वयस्थितीतील द्वयत्व टिकवून अनुभवण्याची परतत्त्वाची असोशी पाईकपणें गेलें स्वामि होऊनि ठेले। परि नाहीं विसरलें स्वामियातें अशा अनुपम शब्दांत व्यक्त करतात ज्ञानदेव. ‘देव होऊनि देव पूजिजे’ असे म्हणणारे नाथराय तरी यांपेक्षा काय वेगळे सांगतात? –