अभय टिळक
एखाद्या मनुष्याला बुद्धी कमी आहे की अधिक यापेक्षाही जी काही बुद्धी त्याला लाभलेली आहे ती किती शुद्ध आहे हे महत्त्वाचे, असे आचार्य विनोबाजींचे एक कमालीचे मार्मिक विधान त्यांच्या लेखनात गवसते. त्या मानाने त्यांनी मोजकेच लिहिले असले तरी विनोबाजींनी जे काही अक्षरसाहित्य प्रसवले ते आहे मात्र विलक्षणच.
विश्वात्मक होऊन प्रगटलेल्या परतत्त्वाकडे ज्ञानदेवांनी मागितलेल्या ‘पसायदाना’चा गाभा जर कोणता असेल तर तो नेमका हाच. ‘पसायदाना’द्वारे ज्ञानदेव विश्वात्मक चैतन्याकडे नेमके काय मागणे मागतात, असा प्रश्न विचारला तर, ‘जो जे वांछिल तों तें लाहो । प्राणिजात’ हे उत्तर ९५ टक्के वेळा तरी किमान मिळतेच. या विश्वातील जो जो जीवमात्र जे जे काही मागेल त्याची ती ती इच्छा देवा तू पूर्ण कर, असे सवंग मागणे ज्ञानदेव मागतील तरी का, असा साधा विचारही आपल्या मनाला कधीच स्पर्शून का व कसा जात नाही? हे मागणे मुखर करण्याच्या आधी ज्ञानदेवांनी जी एक अतिशय प्रगल्भ अपेक्षावजा मागणी विश्वात्मक देवापाशी सादर केलेली आहे तिचे आवाहन आपल्याला स्पर्शूनच जात नाही. ‘जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो,’ हे ज्ञानदेवांचे मागणे हा वास्तवात ठरतो ‘पसायदाना’चा गाभा. ‘व्यंकटी’ म्हणजे वक्रता अथवा कुटिलता. या जगातील जीवमात्रांना जी काही बुद्धी लाभलेली आहे तिला, प्रसंगवशात, वक्रता प्राप्त होते, ही वस्तुस्थिती ज्ञानदेवांनी त्यांच्या मनाच्या तळाशी नोंदवून ठेवलेली आहे.
तात्कालिक फायदा पदरात पाडून घेण्यासाठी वाकड्या मार्गाला लागून कुटिल चाल खेळण्यास सिद्ध बनलेल्या बुद्धीला स्वार्थापायी आलेले वाकडेपण दूर होवो, हा ज्ञानदेवांच्या मागण्याचा सर्वाधिक मूल्यवान सारभूत अंश. किंबहुना, भगवान विष्णूंच्या ‘व्यंकटेश’ या नावाचे आवाहन नेमके हेच होय. स्वार्थपरायणतेपायी कुटिलतेचा आश्रय करणाऱ्या मानवी बुद्धीला चिकटलेली वक्रता जो दूर करतो तो ‘व्यंकटेश’. भक्तराज पुंडलिकरायासाठी विटेवर तिष्ठत उभा ठाकलेला पांडुरंग हा बुद्धीचा जनक होय, अशी साक्ष तुकोबा, ‘बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति’ अशा शब्दांत देतात. विठ्ठलरूपाने पंढरीस प्रगटलेले तेच विष्णुतत्त्व ‘व्यंकटेश’ हे नाम धारण करून तिरुपती क्षेत्रामध्ये विराजमान होय, ही भक्तभागवतांची धारणा.
बुद्धीचा जनिता पांडुरंग पंढरीस उभा आहे तर त्या बुद्धीला कारणपरत्वे झगडणारी कुटिलता दूर करण्यासाठी तिरुमलाच्या पर्वतावर व्यंकटेशस्वामी सज्ज आहे, हे विठ्ठल आणि व्यंकटेश या एकाच तत्त्वाच्या दोन रूपांमधील सामरस्य भागवत धर्म शिरोधार्य मानतो. व्यंकटेशाने त्याचा कृपाप्रसाद देऊन शुद्ध, सरळ, सात्त्विक बनवलेल्या बुद्धीद्वारे विश्वाच्या कल्याणाखेरीज अन्य कशाचीच आस व्यक्त होणार नाही, हा बिनतोड तर्क ‘जो जे वांछिल’ या ज्ञानदेवकृत मागण्याच्या मुळाशी असणे मग स्वाभाविकच नव्हे काय? मुळात, वाकड्या मार्गाने वाटचाल करण्याची प्रेरणाच माझ्या बुद्धीच्या ठायी उमटू नये, अशी प्रार्थना, ‘दुर्बुद्धि ते मना। कदा नुपजो नारायणा’ अशा प्रांजळ शैलीत तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणी करतात. बुद्धी शुद्ध होणे हाच जीवनातील सर्वोच्च लाभ हा जो सिद्धान्त, ‘तुका म्हणे आतां। लाभ नाहीं या परता’ अशा शब्दांत तुकोबा मांडतात त्याचे आवाहन आपल्याला भिडणार तरी कधी?
agtilak@gmail.com
