– अभय टिळक

शब्द व अनुभव यांचे आतड्याचे नाते असते. कोणतीही साहित्यकृती ही तिच्या निर्मिकाच्या अनुभवाची अभिव्यक्ती असते. प्रतिभावंत गायक त्याच्या सादरीकरणातून मांडत असतो त्याला आलेला त्या, त्या रागाचा अनुभव. तीच बाब चित्रकर्मी व चित्रपटकारांचीही. संवेदनशील मनाने विलक्षण तरलपणे टिपलेला एखादा व्यावहारिक अनुभव त्याच्या अथांग मनोविश्वाच्या तळाशी पडून असतो. एके दिवशी अकस्मात त्याला स्पर्श होतो प्रतिभेच्या परिसाचा आणि सुरवंटाचे रूपांतर अनुपम्य फुलपाखरात घडून यावे अगदी तसाच व्यवहारातील तो अनुभव कलानुभवाच्या रूपाने प्रगटतो कलाकृतीचे रंगरूप लेवून. साहित्यात शब्दाविष्काराची गुणात्मक जातकुळी अवलंबून असते ती त्याच्या मुळाशी असलेल्या अनुभवाच्या अस्सलतेवर व त्याचे प्रगटीकरण घडविण्यासाठी साहित्यकृतीच्या निर्मिकाने निवडलेल्या शब्दांच्या प्रत्ययकारकतेवर. लोकमानसाला आकार देण्याची साहित्यकृतीची क्षमता अंतिमत: निर्भर राहते ती याच बाबींवर. बिनसलेला लोकव्यवहार सावरण्यासाठी वाणी वेचणाऱ्या भागवतधर्मी संतमंडळाचा आद्य व अवघा भर अनुभवावरच दिसतो तो याचसाठी. उच्चारलेल्या शब्दांना प्रत्यक्षानुभवाचे अस्तर लगडलेले असलेच पाहिजे. या नियमाची मातब्बरी खासकरून पारलौकिकाच्या क्षेत्रात तर कसोशीने पाळली जाणे अगत्याचे ठरते. हे व्रत जर पाळले गेले नाही तर तशा अनुभवशून्य शब्दजंजाळातून निपजते निव्वळ थोतांड! ‘माया ब्रह्म ऐसें ह्मणती धर्मठक। आपणासरिसे लोक नागविले।’ अशा नेमक्या शब्दांत तुकोबा अधोरेखित करत असलेला धोका कोणता असेल, तर तो हाच. ना ब्रह्माचा, ना मायेचा अणुमात्र अनुभव असलेला वाचाळ वक्ता शब्दांची कारंजी उडवत राहतो खरा; पण आत्मवंचना करण्याबरोबरच श्रोत्यांचीही दिशाभूल करण्याव्यतिरिक्त त्यातून काहीच निष्पन्न होत नसते, हेच तुकोबा बजावतात. अशा तथाकथित ज्ञानव्यवहाराद्वारे कणभरही भले होत नसते कोणाचेही. तुकोबांना तिटकारा आहे तो अनुभवशून्य शब्दज्ञानाचा. ‘माप तैसी गोणी। तुका ह्मणे रितीं दोन्ही।’ अशा विलक्षण मर्मग्राही शब्दांत अशा वाक्व्यवहाराचा उपहास करतात तुकोबा. प्रत्यक्षानुभवाविना उभ्या वक्त्याची स्वत:चीच झोळी रिकामी आहे, तो श्रोत्यांचे पोते काय भरणार, असा तर्कशुद्ध मुद्दा उपस्थित करणारे तुकोबा आज हवे होते! पोट व्यवस्थित भरलेले असेल तर ढेकर आपसूकच येतो. केवळ तोंडाने आवाज काढून ढेकर आल्याचा आभास नाही येत निर्माण करता. ‘जेवलियाविण काशाचें ढेकर। शब्दाचे प्रकार शब्दचि ते’ या थेट शब्दांत तुकोबा अशा वरपांगाचे बिंग फोडतात. एखाद्या विषयाचे शाब्दिक ज्ञान आणि त्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव या दोहोंत महदंतर असते, हेच सारभूत तत्त्व तुकोबांना बिंबवायचे आहे समाजमानसावर. शब्द ज्या अनुभवाकडे निर्देश करतात त्या अनुभवाला थेट भिडण्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात, हे निर्देशित करण्यासाठीच संतमंडळाचा हा सारा खटाटोप. ‘कागदीं लिहितां नामाची साकर। चाटितां मधुर गोडी नेदी।’ असे तुकोबा जे बजावतात त्याचे रहस्य हेच. ‘साखर’ हा शब्द कागदावर लिहून तो कागद अथवा त्यावरील अक्षरे अखंड चाटत बसले तरी साखर खाल्ल्याची गोडी अनुभवावयास येणार आहे का? आठवडाभर वर्गात बसून पाठ गिरवल्यानंतर एक दिवस प्रयोगशाळेत व्यतीत करायचा असतो तो याचसाठी!

agtilak@gmail.com