अभय टिळक

कौरव-पांडवांना शस्त्रविद्या शिकविणाऱ्या द्रोणाचार्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे अश्वत्थामा. त्याच्या बालपणीची कथा बहुतेकांच्या कानावरून गेलेली असते. सहाध्यायी आश्रमवासी मुले दूध पीत असल्याचे अश्वत्थामा बघतो अन् ‘मलाही दूध प्यायला दे’ म्हणून आपल्या आईपाशी आग्रह धरतो. निष्कांचन अवस्थेत जीवन कंठणाऱ्या द्रोणांच्या घरी गाय नसल्याने निरुपाय होऊन पाण्यामध्ये पीठ कालवून अश्वत्थाम्याची आई ते द्रावण त्याला प्यायला देते. याबाबतीत उपमन्यू हा अश्वत्थाम्याचा पूर्वसुरी ठरावा. वसिष्ठ कुळातील व्याघ्रपद नावाच्या ऋषींचा उपमन्यू हा मुलगा. अंबा हे त्याच्या आईचे नाव. एके दिवशी आपल्या वडिलांबरोबर एका यज्ञाला गेलेल्या उपमन्यूने तिथे गोरस बघितला आणि घरी येऊन दूध पिण्याचा हट्ट त्याने आईपाशी धरला. द्यायला घरात दूध नाही आणि मुलाच्या हट्टाला तर खंड नाही, अशा कैचीत सापडलेल्या त्या मातेने- ‘‘दूध पिण्यास मिळावे इतकी शिवोपासना आपल्या पदरी नसल्याने दूध आपल्यापाशी नाही,’’ असे काहीबाही उत्तर देत उपमन्यूचे समाधान केले. परंतु उपमन्यू दृढनिश्चयी होता. त्याने निस्सीम शिवाराधन मांडले. परीक्षा बघण्यासाठी इंद्राच्या रूपात आलेल्या शिवशंकराने- ‘‘शिवाऐवजी तू इंद्राचा धावा कर,’’ अशी आज्ञा उपमन्यूस दिली. मात्र, उपमन्यूही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. ‘‘शिवदर्शन घडले नाही तर मी देहत्याग करीन,’’ असा वज्रनिर्धार त्याने बोलून दाखविल्यानंतर मात्र महादेवाने प्रसन्न होऊन त्याला दुधाचा सागर निर्माण करून दिला. उपमन्यूच्या त्या अनन्यसाधारण उपासनेचा गौरव नामदेवरायांपासून तुकोबांपर्यंत सगळ्या संतांनी गायलेला आहे. ‘‘उपमन्यू बाळक दूध मागों गेला। क्षीरांब्धि दिधला उचितासी।।’’ अशा शब्दांत नामदेवराय क्षीराब्धीच्या निर्मितीची कथा विदित करतात. उपमन्यूचे स्मरण या ठिकाणी करावयाचे कारण- नाथ संप्रदायातील शिवोपासना आणि भागवत धर्मातील विष्णूपूजन यांच्यात समन्वयाचा धागा निर्माण करणारा एक अतिशय महत्त्वाचा तंतू म्हणजे उपमन्यू होय. हिमालयामध्ये उपमन्यूंचा आश्रम होता. आपल्या हिमालय यात्रेदरम्यान त्या आश्रमामध्ये येणे झाले श्रीकृष्णांचे. शिवसहस्रनामाचा उपदेश श्रीकृष्णांना प्राप्त झाला तो उपमन्यूंकडून. शैव सिद्धान्ताचे विस्तृत निरूपण श्रीकृष्णांना करत उपमन्यूंनी त्यांना शैवी दीक्षाही प्रदान केली. नाथ संप्रदायाचा उगमबिंदू असणारे भगवान शंकर व भागवत धर्माचे आराध्य दैवत भगवान विष्णू यांचा आणि या उभयतांपासून प्रवाहित बनलेल्या अनुक्रमे शैवागमाचा व भागवत धर्मविचाराचा संगम महाराष्ट्रामध्ये घडून येण्यामागे असा पूर्वप्राचीन कार्यकारणभाव असला पाहिजे. ‘‘एक तो एका वेगळा नाहीं। दृष्टांत तूं आगमीं पाहीं।।’’ अशा शब्दांत नामदेवराय शिव आणि विष्णू यांचे एकरूपत्व आगम तत्त्वपरंपरेचा आधार देत स्पष्ट करतात. उपमन्यूंना प्रदान केलेल्या क्षीरसिंधूच्या परिसरातच भगवान शंकरांनी त्यांच्या अर्धागिनीच्या कानामध्ये शांभवाद्वयाचे तत्त्वदर्शन प्रगट केल्याचा ज्ञानदेवांचा दाखला या संदर्भात मननीय ठरतो. शिवोपासनेच्या परंपरेची ही पार्श्वपीठिका लाभलेल्या भागवतधर्मी संतमंडळाने विष्णुतत्त्वाच्या उपासनेला मनोभावे अंगीकारावे या एका निर्णायक वळणाचे बीजारोपण या साऱ्या पूर्वेतिहासात रुजलेले आहे. ‘‘नामा म्हणे एक केशव ध्यासी। हरिहर पाहीं ज्याचे अवतार।।’’ हे नामदेवरायांचे उद्गार म्हणजे, त्याच वैचारिक स्थित्यंतरातून प्रसृत झालेल्या नवदर्शनाचे सूक्ष्म सूचनच जणू!

agtilak@gmail.com