– अभय टिळक

‘हरिविजय’, ‘रामविजय’, ‘पांडवप्रताप’ यांसारख्या ग्रंथांचे कर्ते श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजे १७ व्या आणि १८ व्या शतकांच्या संधिकाळातील एक विलक्षण रसाळ आख्यानकवी. पंढरीक्षेत्रापासून जवळच असणारे नाझरे हे श्रीधरकवींचे जन्मगाव. भगवद्भक्त आणि विद्वान कुळात जन्माला आलेल्या श्रीधरस्वामींना निकट सहवास सतत घडला तो पांडुरंगक्षेत्राचा. संस्कृत गं्रथांच्या जोडीनेच मुकुंदराय, ज्ञानदेव, नाथराय, तुकोबा आणि समर्थ यांच्या विचारविश्वाचा श्रीधरस्वामींना अतिशय उत्तम असा अंतरंग परिचय. कमालीची रसगर्भ अशी उदंड ग्रंथरचना प्रसवलेल्या श्रीधरस्वामींचा ‘वेदान्तसूर्य’ हा असाच एक असाधारण ग्रंथ. या ग्रंथातील एक ओवी कमालीची संवेदनशील आणि तितकीच मर्मग्राही. श्रीधरकवी त्या ओवींमध्ये विशद करतात ते शब्दांचे सामथ्र्य नव्हे, तर शब्दांची मर्यादा, शब्दसंपत्तीची शबलता. श्रीधरस्वामींच्या त्या ओवीत दृष्टान्त आहे नववधूचा. मोठ्या थाटामाटात वाजतगाजत लग्नाचा दणका दिवसभर उडवून नात्यागोत्याच्या गदारोळातून ती नवपरिणीत वधू तिच्या सहचरासह सुखासनाकडे प्रयाण करते, त्या वेळची तिची स्थिती- ‘‘मग तेच नितंबिनी। पतीशीं ऐक्य होय शयनीं। मग मातापिताजनही कोणी। दुसरें तेथें सोसेना।।’’ अशा पराकोटीच्या प्रत्ययकारी शब्दांत श्रीधरस्वामी वर्णन करतात. जन्माच्या पहिल्या श्वासापासून ज्या आईबापांनी अपरंपार लाडकोड पुरविले, त्या जन्मदात्यांची उपस्थिती पतीसहच्या एकांतामध्ये जशी पूर्णत: अप्रस्तुत ठरते, अगदी त्याचप्रमाणे अनुभवांचे काही प्रांत असे असतात की तिथे शब्दांच्या उपाधीचा उपसर्गच होतो. हे सांगायचे आहे श्रीधरस्वामींना या दृष्टान्ताद्वारे! अतींद्रिय अशा त्या अनुभवांचे वर्णन करण्यास शब्द अपुरेच पडतात. तिथे थेट भिडायचे ते निखळ अनुभवालाच. ‘‘हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे। बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी।।’’ असे ज्ञानदेव म्हणतात ते शब्दांची अप्रस्तुतता अधोरेखित करण्यासाठीच. पारलौकिकाच्या प्रांतातील अनुभव मोडतात याच कोटीमध्ये. एका विशिष्ट टप्प्यानंतर शब्दांची साथसंगत निरुपयोगीच शाबीत होते. ज्या अनुभवाकडे शब्द निर्देश करत असतात, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी त्या अनुभवाचे वाचक असणाऱ्या शब्दांचे पठण करत बसण्याने साधत तर काहीच नाही आणि एकदा का तो अनुभव हस्तगत झाला, की त्या अनुभूतींकडे दुरूनच केवळ संकेत करणाऱ्या शब्दांचे ओझे जवळ बाळगत बसण्यात काय हशील?

आयुष्यभर कृष्णमूर्ती सांगत राहिले ते हेच. शब्दांचे सारे सामथ्र्य प्रत्ययास येते ते ज्ञानाच्या कुंपणातच केवळ. सत्याचा प्रांत वसतो ज्ञानाच्या कुंपणापलीकडे. शब्दांची मात्रा तिथे चालत नाही. कारण सोपे आहे. अज्ञानाच्या प्रदेशात मन जायबंदी होते. मनाचीच गती खुंटली की आपोआपच वाचा कुंठित बनते. अनुभवाच्या प्रांताचा उंबरठा नेमका तिथेच असतो. तो ओलांडला की पुढे सारी सद्दी समाधानाचीच. ‘‘तुका ह्मणे वाचा राहिली कुंठित। पुढें जालें चित्त समाधान।’’ अशा शब्दांत तुकोबा आपल्या पुढ्यात खुले करतात तेच वास्तव. शब्दांची सर्वात मोठी मर्यादा कोणती असेल तर ती हीच. या साम्राज्यावर मोहोर उमटलेली असते मौनाची. हे मौनही पुन्हा कसे? तर… ‘बोलके’ मौन नव्हे. जिथे मौनही ‘मौन’ धारण करते अशा प्रांताबद्दल बोलायचे असल्यामुळेच- ‘‘म्हणोनि माझी वैखरी। मौनाचेंहि मौन करी।’’ असा सूचक संकेत निरलसपणे करून ज्ञानदेव मोकळे होतात!

agtilak@gmail.com