– अभय टिळक
घरच्या देवघरात देवांची पूजा मांडणे आपल्या सवयीचे असते. हाताशी असलेला समय, कामाची घाईगर्दी, सहज उपलब्ध होणारे पूजासाहित्य, त्यातल्या त्यात कमी गडबडगोंधळाचा वेळ यांच्या चौकटीत पूजा पार पाडण्याचा प्रयत्न आपण करत असतो. हे त्यामानाने सोपे! पण विश्वरूपाने प्रगटलेल्या सर्वात्मकाचे पूजन-अर्चन कसे करावे? ‘…जेणें जग हें समस्त। आंत बाहेरी पूर्ण भरित। जालें आहे दीपजात। तेजें जैसें’ असे त्या रूपाचे जे व्यापकपण ज्ञानदेव १८व्या अध्यायात मांडतात, ते रूप का मोटके आहे? उजळलेली दीपज्योत ज्याप्रमाणे आसमंत अंतर्बाह्य उजळून टाकते, त्याप्रमाणे ज्या परतत्त्वाने हे जग व्यापून टाकलेले आहे, त्याची पूजा करावी तरी कशी? नेमका हाच प्रश्न साधनेच्या परिपक्व दशेमध्ये तुकोबारायांनाही पडलेला असावा याचा दाखला त्यांच्या एका अर्थगर्भ व मार्मिक अभंगावरून आपल्याला मिळतो. या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे नसल्यामुळेच असेल कदाचित, पण तुकोबा हा प्रश्न, ‘कासियानें पूजा करूं केशीराजा। हाचि संदेह माझा फेडीं आता’ अशा शब्दांत विचारतात दस्तुरखुद्द केशवराजालाच. साग्रसंगीत पूजेसाठी आवश्यक असणारे पाणी, गंध, अक्षता, फुले, फळे, दक्षिणा, तांबूल, नैवेद्य, आरती हे सगळेच त्या विश्वात्मकाचे विलसन असेल तर पूजा करणारा तरी त्याच्यापेक्षा भिन्न कसा असेल? अद्वयाचे लेणे ल्यालेल्या दृष्टीला भक्त आणि भगवंत ही एकाच तत्त्वाची दोन प्रगटने भासत असल्याने त्याला घडणारे दर्शनही, ‘तो हां रे श्रीहरी पाहिलां डोळेभरीं। पाहतां पाहणें दूरीं सारूनियां’ या कोटीतील असावे, हे अत्यंत स्वाभाविकच नव्हे का? अशा साधकाच्या लेखी मग पूजा होते तरी कशी, या कोणालाही पडणाऱ्या जिज्ञासेचे उत्तर ज्ञानदेव ‘क्रमयोगा’च्या विवेचनादरम्यान, ‘तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं’ अशा पराकोटीच्या मार्मिक शैलीत देतात. भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या ज्ञानाधिष्ठित कर्मप्रधान भक्तीतत्त्वाचे सारसर्वस्व ज्ञानदेवांनी या ओवीमध्ये ठासून भरलेले आहे. हातून घडणारे प्रत्येक कामच जो पूजासामग्री गणली जाणारी फुले समजून विश्वात्मकाची प्रतिक्षणी पूजा करत राहतो त्या अद्वयोपासकाला अशा अनन्यसाधारण पूजेचा परतत्त्वाकडून प्राप्त होणारा प्रसाद म्हणजे वैराग्य होय असा ज्ञानदेवांचा रोखठोक सांगावा आहे ‘क्रमयोगा’मध्ये. कर्माचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे! प्रापंचिक कामे व जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडल्यामुळे मिळालेल्या प्रसादरूपी वैराग्याचा साधकाच्या जीवनावरील अपेक्षित परिणाम नेमका काय, हाही प्रश्न यासंदर्भात आता स्वाभाविकपणेच कळीचा ठरतो. ‘ययाचि गा कपिध्वजा। स्वकर्माचिया महापूजा। तोषला ईशु तमरजा। झाडा करुनि’ अशा शब्दांत ज्ञानदेव त्याचाही उलगडा करून टाकतात. नेमस्तपणे, संतुलित जीवनपद्धतीद्वारे आमरण आचरण केलेल्या कर्मोपासनेचा परिणाम म्हणून हस्तगत झालेल्या वैराग्यामुळे साधकाच्या बुद्धीला चिकटलेल्या तामस आणि राजस गुणांची झाडणी सहजच घडून येते, हे आहे ज्ञानदेवांचे याविषयी प्रतिपादन. असा साधक मग त्याची रज-तमापासून मुक्त झालेली त्याची बुद्धी शुद्धसत्त्वाच्या वाटेने गतिमान बनवतो. ‘बरवे दुकानीं बैसावें। श्रवण मनन असावें’ असा जो अनुभवसिद्ध दाखला तुकोबा तुम्हा-आम्हाला देतात त्याचा उलगडा आता यावरून तरी व्हावा.
agtilak@gmail.com
