तुकोबांची साधकावस्था हा त्यांच्या जीवनक्रमातील सर्वाधिक रोचक आणि अभ्यासनीय भाग ठरतो. आंतरिक उन्नतीसाठी धडपडणारी एखादी हस्ती किती कसोशीने स्वत:च्या अंत:करणाचा धांडोळा घेऊ शकते, याचा वस्तुपाठ म्हणजे साधकावस्थेदरम्यान महाराजांनी केलेले आत्मपरीक्षण. हे सोपे नाही. अध्यात्माची परिभाषा आत्मसात होणे आणि परमतत्त्वाची प्रत्यक्षानुभूती हस्तगत होणे, या दोन अत्यंत वेगळ्या बाबी होत. या दोहोंतील पहिली बाब सोपी, तर दुसरी कमालीची दुष्कर. परिणामी, कथनी आणि करणी यांत बहुतेक वेळा अंतर राहतेच. ते तसे राहू नये यासाठी तुकोबा सततच किती दक्ष असत याचे दाखले त्यांच्या अभंगरचनेमध्ये आपल्याला ठायी ठायी गवसतात. ‘‘बोलविसी तैसें आणीं अनुभवा। नाहीं तरी देवा विटंबना।’’ अशा कळकळीच्या शब्दांत महाराजांनी या संदर्भात भाकलेली पांडुरंगाची करुणा त्याची पुरेपूर साक्ष पुरविते. अंतर्बाह्य़ एकच एक तत्त्व व्यापलेले असल्यामुळे सगळे विश्व हे माझे घरच होय, असे बोलणे सोपे असते. परंतु तशी अनुभूती येण्यासाठी बुद्धी स्थिर असावी लागते. ‘‘हें विश्वचि माझें घर। ऐसी मती जयाची स्थिर।’’ असे ज्ञानदेव जे आवर्जून सांगतात, त्यामध्ये दडलेले रहस्य आपण समजावून घेणार की नाही? सगळ्यांत अवघड गोष्ट कोणती असेल तर ती हीच. बुद्धीच्या चंचलतेचा उपसर्ग तुकोबांनाही त्यांच्या साधनापर्वात भरपूर सहन करावा लागला असला पाहिजे याची चुणूक- ‘‘काय हो स्थिर राहेल बुद्धी। कांहीं अरिष्ट न येल मधीं। धरिली जाईल ते शुद्धी। शेवट कधीं तो मज न कळे।’’ अशा शब्दांत एके ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या खंतयुक्त चिंतेद्वारे प्रगट होते. बुद्धीच्या संदर्भात तुकोबाराय इथे दोन बाबी निर्देशित करतात. एक म्हणजे, बुद्धी स्थिर होणे महत्त्वाचे. तर स्थिर झालेली बुद्धी शुद्ध होणे हेही तितकेच अनिवार्य. या उभय गुणांनी बुद्धी अलंकृत बनणे, हे खरे आव्हान. याला कारणही तितकेच सबळ आहे. बुद्धी क्षणोक्षणी रंग पालटत असते. मनाच्या एकाग्र झालेल्या अवस्थेलाच बुद्धी असे म्हणत असले, तरी मुळात वृत्ती एके ठायी स्थिर होत नाही, हीच सर्वाधिक जटिल बाब ठरते. त्यासाठी- ‘‘दृढ माझें मन। येथें राखावें बांधोन।’’ अशी कळकळीची विनंती अखेर तुकोबाराय विठ्ठलालाच करतात. शिवदर्शनाचा सोहळा असणाऱ्या दृश्य जगामध्ये सर्वत्र समान विलसत असलेले तत्त्व एकदा का बुद्धीला आकळले की ती आपोआपच समत्वाला पावेल, हे खरे असले तरी समतेचा प्रत्यय अस्थिर बुद्धीला यावा कसा, हाच मोठा यक्षप्रश्न. या प्रश्नाचे उत्तर तुकोबाराय कमालीच्या मार्मिकपणे देतात. विठ्ठलाच्या समचरणांशी बुद्धी स्थिर होणे, ही पांडुरंगाची कृपा आपल्यावर झाल्याची चिरखूण समजावी, अशी नितळ सोडवणूक महाराज- ‘‘मन रंगलें रंगलें। तुझ्या चरणीं स्थिरावलें। केलिया विठ्ठलें। ऐसी कृपा जाणावी।’’ इतक्या नि:संदिग्ध शब्दांत करतात. सर्व भूतमात्रांच्या माध्यमातून एकमात्र परमात्म तत्त्वाचेच दर्शन घडत राहते, ही अनुभूती आली की पांडुरंगाची कृपा परिपूर्ण झाल्याचा विश्वास बाळगायला हरकत नाही, असा स्वानुभव तुकोबाराय- ‘‘विश्वास तो खरा मग। पांडुरंगकृपेचा।’’ अशा शब्दकळेद्वारे विदित करतात. ‘कृपा’ या शब्दाचा परमार्थाच्या प्रांतातील वास्तव अर्थ उमगण्याच्या वाटा महाराज मोकळ्या करतात त्या अशा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभय टिळक agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercy advayabodh article zws
First published on: 22-03-2021 at 00:27 IST