विवेकऐसें पाहतां सावकाशीं। गुरुत्व आलें जगासी…

‘आत्मनिर्भर अध्ययनाचा आदर्श वस्तुपाठ’ हे दत्तात्रेयांचे रूपदर्शन जाणीवपूर्वक घडवतात नाथराय.

loksatta advayabodh article abhay tilak

‘‘निसर्ग हा मानवाचा सर्वात मोठा व आद्य गुरू होय’’, हे वाक्य अनेकवार उच्चारले जाते. मात्र, या विधानाचा इत्यर्थ बिंबायचा असेल तर, ‘गुरू’ आणि ‘गुरू-तत्त्व’ यातील साम्य-भेद नीट आकळण्याचा प्रगल्भपणा अंगी बाणणे अगत्याचे ठरते. तसे झाले, की अध्ययन- अध्यापनाचा व्यवहार अंतर्बाह्य पालटून जातो. पैठणवासी नाथांचे आणि पर्यायाने विश्वगुरू दत्तात्रेयांचे अखिल विश्वावरील उपकार ते नेमके तेच. ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रात डोळस उपासना करायची असते ती ‘गुरू’ या ‘तत्त्वा’ची, हा अ-लौैकिक आदर्श स्वत:च्या आचरणाद्वारे लोकमानसाच्या पुढ्यात ठेवणे, हे ‘परमगुरू’ दत्तात्रेयांचे जगावरील चिरंतन उपकार होत. आपल्या अवघ्या दैवतमंडलात ‘दत्तात्रेय’ हे एक अ-साधारण असे उपास्य दैवत होय. ‘योगप्रधानअवधूत योगी’ असा डिंडिम त्रिखंडात गाजणाऱ्या दत्तात्रेयांना परंपरा मानते भगवान विष्णूंचा सहावा अवतार. दत्त, नाथ, महानुभाव, वारकरी, समर्थ अशा विविध उपासना परंपरांनी दत्तात्रेयांचे आराधन शिरोधार्य मानलेले आहे. नाथांचे सद्गुुरू जनार्दनस्वामी हे तर दत्तसांप्रदायिक. नाथ स्वत: दत्तात्रेयांचे अनुग्रहित. ‘परतत्त्वाचा क्षमाप्रधान अवतार’ असा ज्यांचा निर्देश परंपरा करते अशा दत्तप्रभूंच्या उपासनेचे पाठ जनार्दन स्वामींकडून लाभलेल्या नाथांना ‘शांतिब्रह्म’ का संबोधतात याचा उलगडा यातून  व्हावा. योग आणि तंत्र अशा उभय पंथांचे आचार्य म्हणून दत्तात्रेयांचा लौकिक प्राचीन काळापासून  आहे. असे असले तरी, ‘आत्मनिर्भर अध्ययनाचा आदर्श वस्तुपाठ’ हे दत्तात्रेयांचे रूपदर्शन जाणीवपूर्वक घडवतात नाथराय. त्यासाठी नाथांनी आधार घेतला आहे तो श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंदातील अवधूतांच्या आख्यानाचा. यदुराजाशी झालेल्या संवादादरम्यान, आपण २४ गुरू केल्याचे वास्तवकथन अवधूत करतात, असा प्रसंग श्रीमद्भागवतामध्ये आहे. पंचमहाभूतांपासून ते हत्ती, अजगर व भिंगुरटीसारख्या प्राण्यांकडून जीवनविद्या शिकत राहिल्याने मी त्यांना गुरुत्व बहाल केलेले आहे, असे अवधूत विदित करतात यदुराजाला. ठाकावया निजबोधासी। निजविवेकें अहर्निशीं। गुरुत्व देऊ नि अनेकांसी। निजहितासी गुरू केले  हे नाथांनी अवधूतांच्या मुखी तिथे घातलेले वचन खुल्या लोकविद्यापीठातील स्वयंपूर्ण अशा अध्ययन-अध्यापन प्रणालीची गुरुकिल्लीच जणू समाजपुरुषाच्या हाती सुपूर्त करते. ज्ञानव्यवहाराच्या चाव्या संकुचित वृत्तींच्या अभिजनांच्या मुठीत बंदिस्त असणाऱ्या लोकव्यवहारामध्ये ज्ञानसंपादनासाठी ज्ञानपिपासू बहुजनांनी कोणती व्यूहरचना कशी अवलंबावी याचा जणू हा वस्तुपाठच. मुक्त भवताल हीच खुली पाठशाला आणि प्रयत्नपूर्वक जोपासलेली विद्यार्थिवृत्ती यांच्या संगमाद्वारे तिथे उमलतात अध्ययन-अध्यापनाचे ताटवे. यांचिया शिक्षिता वृत्ती। शिकलों आपुलिया युक्तीं। मग पावलों आत्मस्थिती। विकल्पभ्रांती सांडूनी  अशी त्या बिर्नंभतींच्या ज्ञानविश्वातील शिक्षणपद्धती यदुला समजावून सांगतात अवधूत. ज्ञानोपासकाने शिकाऊ दृष्टी जोपासली तर जगात ठायी ठायी गुरू-तत्त्व प्रत्ययास येते हाच यदू आणि अवधूत यांच्या संवादाचा गाभा. ऐसें पाहतां सावकाशी। गुरुत्व आलें जगासी हे अवधूतांच्या मुखी नाथांनी घातलेले उद्गार म्हणजे तशा मुक्त विद्यापीठाचे बोधवाक्यच जणू!

– अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nature is the greatest and foremost guru of man akp

Next Story
मूळसूत्रloksatta advayabodh article abhay tilak
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी