अद्वयबोधाच्या लेण्याने दृष्टी अलंकृत झालेल्या उपासकाच्या लेखी जन्माला येणे ही शिक्षा नसून तो असतो एक सोहळा. ‘शिव’नामक आदितत्त्वाचे विलसन हेच दृश्य जगाचे आदिरूप असल्याने, प्रतिक्षणी त्याचा निकट संबंध येत असतो नानाविध रंगरूपाकारांनी भवतालात सर्वत्र विलसणाऱ्या शिवतत्त्वाच्या असीम सत्तेशी. मोक्षसुखाची तमा त्याला वाटत नसते त्यापायीच. ‘‘भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता। तुका म्हणे सत्ता धरूं निकट सेवेची।’’ ही तुकोबांची सामर्थ्यभारित शब्दकळा म्हणजे ठोस पुरावाच म्हणायचा त्या जीवनदृष्टीचा. अस्तित्वाच्या या असाधारण कोटीचे अमुप, अनाम सुख आकंठ उपभोगणाऱ्या अशा उपासकाला ‘ज्ञानी’ म्हणावे की ‘भक्त’, हा प्रश्नही ठरतो मग पूर्णत: गैरलागूच. नाव काहीही दिले तरी अशा जीवनयोग्याची जगण्याची परी, ज्ञानदेवांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘‘ते वेळीं जयाकडे वास पाहे। तेउता मीचि तया एकु आहे। अथवा निवांत जरी राहे। तरी मीचि तया।’’ अशी असते. विश्वाच्या वास्तव स्वरूपाचे भान अंत:करणात पुरते ठसवलेले असल्याने तो ‘ज्ञानी’ गणावा लागतो; आणि त्याच वेळी, सर्वात्मक शिवचैतन्याशी अखंड ऐक्याचा सोहळा भोगत असल्यामुळे ‘भक्त’ ही तर ठरते त्याची सहजावस्थाच. कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वाला प्रवेशच नसतो तिथे. अंतर्बाह््य नांदत असते प्रगाढ एकरसता. ‘‘हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणोनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि।’’ हे ज्ञानदेवांचे कथन सूचन घडवते तशाच एकात्म अस्तित्वाचे. अफाट मौज करून ठेवलेली आहे इथे ज्ञानदेवांनी. शैवागमाच्या तत्त्वदर्शनाशी कोठेही कणभरदेखील तडजोड करावी लागू नये म्हणून ‘भक्ती’ या संकल्पनेला अनोखा असा पेहराव चढवतात ज्ञानदेव. विश्वोत्तीर्ण असणारा परमशिव ज्या वेळी विश्वात्मक होऊन विलसू लागतो तेव्हा त्याच्या तशा प्रकाशमान प्रगट रूपाचेच संबोधन ‘भक्ती’ होय, असे अपूर्व नवदर्शन सिद्ध करतात ज्ञानदेव भक्तितत्त्वाचे. ज्ञानदेवांच्या या प्रतिपादनानुसार भक्ती ही ना ठरते साध्य, ना ती होय साधन. भक्ती म्हणजे अवस्था! सांप्रदायिक पाश्र्वपटानुसार संज्ञा काय त्या बदलतात इतकेच. ‘‘ज्ञानी इयेतें स्वसंवित्ति। शैव म्हणती शक्ति। आम्ही परमभक्ति। आपुली म्हणों।’’ असा खुलासा आहे ज्ञानदेवांचा या संदर्भात. ‘संवित्ती’ म्हणजे ‘पूर्ण ज्ञान’ अथवा ‘सम्यक बोध’. ज्ञान आणि भक्ती यांचे ऐक्य म्हणजे ‘संवित्ती’. ज्ञानमार्गी ज्याला पूर्ण ज्ञान म्हणतात, शैवागमाचे अनुयायी ज्या तत्त्वाला ‘शक्ती’ असे संबोधतात, त्यालाच भक्तभागवत म्हणतात ‘भक्ती’- इतके सरळसोपे आहे हे! ज्ञानदेवांच्या याच कथनाचे सुलभीकरण ‘‘सहज माझी जे प्रकाशस्थिती। ते ‘भक्ती’ बोलिजे भागवती। ‘संवित्ती’ बोलिजे वेदांती। शैवीं ‘शक्ती’ बोलिजे।’’ इतक्या निर्मळ शैलीत करतात ‘नाथभागवता’मध्ये नाथराय. निरामय, निकोप प्रेम हा तर अशा भक्तीचा गाभा. पंढरीला विटेवर उभा ठाकलेला पांडुरंग अद्वयबोधाचेच प्रगटीकरण होय, असा निर्वाळा- ‘‘पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय। तूंचि बापमाय पांडुरंगा।’’ अशा निर्मळ शब्दांत देतात नामदेवराय. मायबापांकडे मागायचे असते केवळ प्रेम. ‘‘गात जागा गात जागा। प्रेम मागा विठ्ठला।’’ असा उपदेशवजा सांगावा आहे वारकऱ्यांना तुकोबारायांचा तो त्यापायीच! – अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

agtilak@gmail.com   

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur vitthal vari akp
First published on: 16-07-2021 at 00:09 IST