अभय टिळक

मराठी नवकवितेच्या प्रवर्तकांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या कविवर्य बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर यांची ‘गणपत वाणी’ ही एक अप्रतिम कविता. एके काळी शालेय पाठय़पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून समावेश असणारी ही कविता आज कोणाच्या आठवणीतही नसेल कदाचित. कविताच काय, ‘वाणी’ ही संस्थादेखील काळाच्या ओघात हळूहळू निस्तेज बनत चाललेली दिसते. गणपत वाण्याच्या दुकानांची जागा आज बळकावत आहेत टोलेजंग ‘मॉल्स’. कोपऱ्यावरचा वाणी गेला आणि जाताना एकटा गेला नाही तर केवळ त्याच्याच दुकानामध्ये आढळणाऱ्या अनेक जिनसाही आपल्याबरोबर घेऊन गेला. पुडय़ाचा दोरा ही त्यांतील अशीच एक अव्वल चीज. महिन्याचे वाणसामान भरून घरी आणले की गेल्या पिढय़ांतील मध्यमवर्गीयांच्या घरोघरी पुडय़ांत भरलेल्या जिनसा फडताळ्यातील बरण्यांमध्ये अथवा डब्यांमध्ये विराजमान होत. जिन्नस गुंडाळून तयार होणाऱ्या कागदाच्या पुडय़ांची तोंडे बंद करण्यासाठी वाण्याने वापरलेला दोरा, मग निगुतीने संसार करणाऱ्या घरोघरच्या गृहिणी दक्षपणे गुंडाळून हाताशी ठेवत. सोडलेल्या दोऱ्याची अलवार गुंडाळी त्यानंतर केली जाई. हाताच्या बोटांची चुंबळी करून तिच्याभोवती दोऱ्याचे वेढे देत गुंडाळी आकार घेई. जसजसे महिने उलटत जात तसतसे त्या गुंडय़ाचे आकारमान वाढत राही. पुडय़ाच्या दोऱ्याचे वेढे एकावर एक चढत जात आणि मग पुडय़ाच्या दोऱ्याचा गुंडा चांगलाच बाळसेदार दिसू लागे. त्या गुंडय़ात सर्वत्र दोरा आणि केवळ दोराच असे. आत-बाहेर, मध्यभागी सगळीकडे केवळ दोराच. औषधाला म्हणूनही त्यांत दोऱ्याखेरीज अन्य पदार्थ सापडत नसे. जगाचे स्वरूपही अगदी असेच आहे, हे सूत्र योगीराज चांगदेवांना पटवून सांगण्यासाठी, ‘चांगदेवपासष्टी’मध्ये ज्ञानदेवांनी अगदी हेच रूपक तंतोतंत वापरलेले बघितले की आपण पुरते स्तिमित होऊन जातो! तुमचे आराध्य दैवत वटेश्वर परमशिवच विश्वाकार प्रगटलेला असल्याने या जगात अंतर्बाह्य़ अन्य कोणताही दुसरा पदार्थ संभवतच नाही, असे ज्ञानदेव- ‘‘सुताचिये गुंजे। आंतु बाहिरि नाहिं दुजे। तेंवि तीनपणेवीण जाणिजे। त्रिपुटी हे।।’’ अशा शब्दांत चांगदेवांना विशद करतात. वस्तुत: जगाचे स्वरूप हे असे असल्यामुळे, तिथे साकारणारी दृश्ये, ती बघणारे दर्शक आणि दृश्य व दर्शक या दोघांच्या एकत्र येण्यातून उमलणारा दर्शनाचा अनुबंध या त्रिपुटीतही पूर्ण सामरस्यच नांदते, हे ज्ञानदेव सूचित करतात. द्रष्टा आणि दृश्य हा स्वरूपत: शिवतत्त्वाचाच विलास. कोठेही द्वैत नाही. एकच तत्त्व ज्या वेळी द्रष्टा आणि दृश्य अशा उभय रूपांनी नटते, त्या वेळी उद्भवणारी ‘द्रष्टा-दृश्य-दर्शन’ ही त्रिपुटी म्हणजे एकाच वस्तूचे नटणे-विलसणे असते, हे ज्ञानदेव- ‘‘तेंवि आपण चि आपुलां पोटीं। आपणेया दृश्य दावीत उठी। द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी। मांडे ते हे।।’’ असे स्पष्ट करून सांगतात. ‘‘सांडिलीं त्रिपुटीं। दीप उजळला घटीं।’’ हे तुकोबांचे उद्गार म्हणजे त्याच प्रचीतीची खूण नव्हे का!

agtilak@gmail.com