अखिल विश्वावर मंगळाचा वर्षाव निरंतर घडवत राहण्याचे जीवितध्येय अंगीकारून अवतरलेल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला ‘पसायदाना’मध्ये ज्ञानदेवांनी कल्पतरूंची दिलेली उपमा अ-साधारण व तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे कल्पतरू ‘चल’ असावेत (‘चल’ म्हणजे फिरते, गतिमान, ‘अ-चल’ जे नाहीत ते) हे ज्ञानदेव मागतात विश्वात्मकाकडे. घटापटांच्या चर्पटपंजरीत आणि मठाश्रमांच्या तटबंदीमध्ये बंदिस्त झालेली तत्कालीन ज्ञानव्यवहाराची व्यवस्था मुक्त बनवत लोकसमूहांचे ज्ञानसंस्कारांच्या माध्यमातून उन्नयन घडवून आणायचे, तर त्या प्रक्रियेचा आत्मा असणारा शिक्षक हा घटकही तसाच मुक्त हवा, हे ज्ञानदेवांच्या ठायी जागृत असणारे भानच इथे प्रगटलेले आहे. शिक्षणसंस्कारांच्या परिघाबाहेरच राखलेले तत्कालीन तथाकथित शूद्रातिशूद्र समाजघटक आणि घराच्या उंबरठ्याबाहेर फारसा वाव नसलेले चारी वर्णांतील तत्कालीन स्त्री-मानस ज्ञानाने सिंचित बनवायचे तर शिक्षक फिरता, गतिमान, ‘चल’ असावयास हवा, हे प्रगल्भपणे हेरूनच लोकमानस मूल्यसंस्कारांनी परिष्कृत बनविणाऱ्या ईश्वरनिष्ठरूपी ज्ञानतरूंच्या बागांना ‘चल’ हे विशेषण ज्ञानदेवांनी डोळसपणे जोडले. विद्यामंदिरांच्या चौकटीपर्यंत पोहोचणे ज्यांना दुरापास्त होय अशांच्या राहत्या घरांच्या दारवंट्यापाशी ज्ञानाची गंगा घेऊन जाण्यासाठी, नाथरायांनी, लोकसंस्कृतीच्या उपासकांनाच लोकशिक्षकाचा पेहराव चढवावा ही बाब, ‘पसायदाना’तील गाभातत्त्व नाथांच्या ठायी बिंबल्याचा पुरावाच जणू. पंचांग वाचून रोजचा दिनविशेष ग्रामस्थांना समजावून सांगणारा त्या काळच्या गावगाड्यातील नाथांचा ‘जोशी’ त्या बदल्यात गृहस्थधर्मीयांकडून जे दान मागतो ते या संदर्भात कमालीचे मननीय ठरते. विषम बुद्धीचे नाणें।  ओंवाळून द्यावें मज जोशाकारणें। आपुले नि:शेष बरें करणें। तरी दान करीं वेगेंसीं बये असे आवाहन करणारा ‘जोशी’ हा येरागबाळा भिक्षेकरी नव्हे, हे जाणवते-भावते का आपल्याला? नाथांचा हा ‘जोशी’ मागत असलेले दान होय केवळ अ-साधारण असेच. आपली विषम बुद्धी आपण ओवाळून त्याच्या झोळीत एकदा का समर्पित केली की आपला अवघा व्यवहार नि:शेष बरा (म्हणजेच, ‘चांगला’) होईल, असा शकुन सांगतो आहे नाथांचा हा ‘जोशी’. लोकमानसामध्ये समतेचे अधिष्ठान दृढ होणे हा याच्या दृष्टीने होय ‘शकुन’. अवघा तो शकुन। हृदयीं देवाचे चरण। येथे नसतां वियोग। लाभा उणें काय मग या तुकोबारायांच्या उद्गारांत नाथांच्या ‘जोश्या’चेच हृदगत नाही का होत प्रर्तिंबबित? समचरणदृष्टि विटेवरी साजिरी। तेथें माझी हरी वृत्ति राहो असे मागणे तुकोबा रुक्मिणीवराकडे का मागतात याचे रहस्य आले का आता ध्यानात? भविष्यकथन करणारा तत्कालीन ग्रामजीवनातील नाथांचा ‘सरवदा’ हा लोकसंस्कृतीचा उपासकही असाच अ-लौकिक. घरीदारी फिरून भविष्यकथन केल्याबद्दल हा ‘सरवदा’ जे दान मागतो ते आणि ते देतेवेळी दात्याने पाळावयाची सारी आचारसंहिता तर विलक्षणच होय. वासनेचें काळें चिरगुट। मीपणाची बांधोनी मोट। विषयवासनेची सोडोनि गाठ दानश्रेष्ठ मज करा कीं जी राजांनो हे नाथांनी त्याच्या मुखे केलेले आवाहन आजही तितकेच प्रस्तुत नव्हे काय? समाजमनावर मानवधर्ममूल्यांचे संस्कार घडविणाऱ्या लोकशिक्षकांच्या या ऋणांचे पूर्ण विस्मरण आणि त्या मूल्यांची झालेली हेळसांड यामुळेच शाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास घेण्याची वेळ आपल्यावर आज आली असावी का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Value education upliftment of the masses through enlightenment akp
First published on: 20-12-2021 at 00:08 IST