वर्तमानातून भावी काळाचा तर्काधिष्ठित आणि विचारपूर्वक वेध कसा घ्यावा, हे शिकवणाऱ्या ऑल्विन टॉफलर यांना आदरांजली वाहणारे विशेष संपादकीय..

बदल वेगाने होत आहेत आणि ते जिरवण्याची, त्यांनुसार बदलण्याची माणसाची क्षमता तोकडी आहे. त्यांतून माणसे भेलकांडतात. परिणामी गुन्हेगारी, नशेबाजीत वाढ होते आणि काही वेळा त्यांतूनच धार्मिक वा राजकीय मूलतत्त्ववादाकडे लोक वळतात, असे त्यांनी म्हटले होते

बदल घडतच असतात. ते एक सातत्य असते. पण मानवी मन हे प्रामुख्याने स्थितिवादास पक्षपाती असते. बदलांना सामोरे जाण्यास सहसा नाखूश असते. पण बदल टळणारे नसतात. म्हणूनच बहुधा माणसाला बदलांची भीती असते आणि त्याहून अधिक बदलांच्या वेगाची. आज म्हणजे सध्या ज्या माहिती-तंत्र युगात आपण वावरतो त्या आजमध्ये या बदलांचा वेग गरगरून टाकणारा आहे. अशा परिस्थितीत आपण कोठे चाललो आहोत, उद्याच्या शक्यता काय आहेत हे माहीत नसणे म्हणजे अंधाऱ्या विहिरीत उडी टाकण्यासारखे. व्यवस्थेत गोंधळ निर्माण करणारे. तो टाळण्यासाठी भावी बदलांची दिशा, त्यांचे प्रवाह आधीच समजून घेणे अत्यावश्यक असते. ऑल्विन टॉफलर यांनी आयुष्यभर हे काम केले. त्यांच्या लेखी बदल हा केवळ जीवनाचा आवश्यक भाग नव्हता, तर तेच जीवन होते. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांना मृत्यूने कवटाळले. तोवर ते हेच ‘जीवन’ समजून घेत होते, समजावून सांगत होते. उद्याचा चेहरामोहरा कसा असेल, पुढे काय घडू शकेल याचा होरा मांडत होते. अशा व्यक्तीला आपल्याकडे ज्योतिषी म्हणतात. पण टॉफलर ज्योतिषी नव्हते. ते भविष्य सांगत नव्हते. वेधशाळेतील हवामानशास्त्रज्ञांनी वातावरणातील बदल टिपून, समुद्रातील प्रवाह तपासून येत्या काही काळातील हवामानाचा अंदाज सांगावा, तसे ते भविष्यातील शक्यता सांगत होते. या अर्थाने ते भविष्यद्रष्टे होते. त्यांनी वर्तविलेल्या काही शक्यता खऱ्या ठरल्या. काही चुकीच्या ठरल्या. खरे तर असे म्हणणेही अंशत: चुकीचे ठरेल. भविष्यात शहराचा ऱ्हास होईल, सर्वानी मिळून एका विशिष्ट वेळी एका ठिकाणी जमून काम करायचे, ही कचेरीची, कारखान्यांची संकल्पना; पण भविष्यात असे एका ठिकाणी येऊन काम करण्याची आवश्यकता राहणार नाही. लोक घरातून आपापली कार्यालयीन वा कारखान्यांतील कामे करतील असे चित्र टॉफलर यांनी उभे केले होते. पण ना शहरे लयास गेली, ना कचेऱ्या वा कारखान्यांची गरज संपली. टॉफलर यांना हे सर्व नजीकच्या भविष्यात घडेल असे वाटत होते. तसे झालेले नाही. पण कदाचित पुढचा काळ माहिती-तंत्रज्ञानाचे युग अशी बिनशहरांची, बिनकचेऱ्यांची व्यवस्थाही आणील. पण टॉफलर यांची थोरवी केवळ त्यांनी इंटरनेटयुक्त समाज तयार होईल, केबल टीव्हीचे जाळे पसरेल, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्था यांमुळे समाजाचे बरेचसे काम संगणकीय दूरसंचार यंत्रणेद्वारे केले जाईल, माणसे स्वत:ची ‘कार्बन कॉपी’ – क्लोन तयार करतील अशा काही शक्यता वर्तविल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरल्या म्हणून नाही. त्यांची महत्ता शोधायची तर बदलांच्या दिशा आणि भविष्यातील बदलांच्या प्रवाहांकडे ते ज्या पद्धतीने गेले आणि त्यांची मांडणी केली यातून. त्या मांडणीमध्ये तर्कशुद्धता होती, वैज्ञानिकाची शिस्त होती, भूत आणि वर्तमानाचे रास्त आकलन होते. त्यामुळे त्यांचे एखादे भाकीत चुकले म्हणून काहीही बिघडत नव्हते. अर्थात तरीही त्यांच्यावर त्याबद्दल टीका झालीच. त्या टीकेची पातळी अर्थातच वेधशाळेचा अंदाज चुकला म्हणून तिची टिंगलटवाळी करणाऱ्या कारकुनी मनोवृत्तीएवढी होती. तिला भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारांची गरूडभरारी पेलवणारी नव्हती. ही भरारी अनुभवायची असेल, तर त्यासाठी टॉफलर यांच्या पुस्तकांकडे जावे लागेल.

‘फ्यूचर शॉक’ हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक. साठच्या चळवळ्या दशकाच्या मध्यावर ते आले. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली जागतिक नकाशाची नवी मांडणी, उत्कलन बिंदूसमीप आलेले शीतयुद्ध, युरोप-अमेरिकेतील विद्यापीठांतून खदखदत असलेला डावा असंतोष आणि त्यात अर्थव्यवस्थेला आलेली गती, औद्योगिक आघाडीवरील उत्पादनाची घोडदौड असा तो काळ. या कालखंडात टॉफलर हे एका वृत्तपत्रासाठी व्हाइट हाऊस आणि काँग्रेसची बातमीदारी करीत होते. याच कालखंडात त्यांनी फॉच्र्युन मासिकासाठी सदरलेखनही केले. त्यांच्या लेखांचे विषय कामगार, व्यापार, व्यवस्थापन असे होते. एकीकडे जवळून पाहिलेले राजकारण आणि दुसरीकडे कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते तरी कसे यासाठी जाणीवपूर्वक काही काळ कामगार म्हणून घेतलेला अनुभव यातून व्यवस्थेची चाके कशी फिरतात याची जाणीव त्यांना झाली होती. आयबीएम ही अमेरिकेतील संगणकक्षेत्रातील तेव्हाची दादा कंपनी. त्या कंपनीसाठी त्यांनी याच काळात संगणकांच्या सामाजिक आणि संस्थात्मक परिणामांचा अभ्यासही केला होता. फ्यूचर शॉकची बीजे त्यामध्ये होती. १९७० साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातून त्यांनी वेगाने घडत असलेल्या बदलांचे प्रवाह कोणत्या दिशेने चालले आहेत याचा नकाशाच सादर केला. जागतिक विचारविश्वाला त्यांनी पहिल्या पुस्तकातून ‘इन्फर्मेशन ओव्हरलोड’ – अतिमाहितीचा बोजा – अशी अत्यंत महत्त्वाची संकल्पना दिली. बदल वेगाने होत आहेत आणि ते जिरवण्याची, त्यानुसार बदलण्याची माणसाची क्षमता मर्यादित आहे. त्यातून माणसे भेलकांडतात. परिणामी गुन्हेगारी, नशेबाजी, सामाजिक दूरात्मता यात वाढ होते आणि काही वेळा त्यातूनच धार्मिक वा राजकीय मूलतत्त्ववादाकडे लोक वळतात, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विचारांनी मिखाईल गोर्बाचेव्ह, झाओ झियांग यांच्यासारखे जागतिक नेते प्रभावित झाले. इन्फर्मेशन ओव्हरलोडच्या परिणामांकडेही त्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर.. असे म्हणणे आज बाळबोध वाटेल, पण मग भविष्याचा वेध घ्यायचा असतो तो कशाकरिता, असा प्रश्नही येथे उभा राहील.

‘द थर्ड वेव्ह’ हे याच मालिकेतील त्यांचे आणखी एक गाजलेले पुस्तक. ते ऐंशीमधले. मानवी इतिहासात उत्पादननिर्मितीच्या दोन लाटा येऊन गेल्या. कृषीसंस्कृती आणि औद्योगिकीकरण. आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे. ती माहिती तंत्रज्ञानाची. हे बदल कसे झाले आणि होणार हे सांगणाऱ्या या पुस्तकातून आज आपणास एकविसाव्या शतकाचे प्रतिबिंब दिसते. भारताच्या संदर्भात हे पुस्तक आणखीच मजेदार ठरते. याचे कारण आपल्याकडे आज २०१६ मध्येही या तिन्ही लाटा एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. आजही आपल्या शेतीप्रधान देशात औद्योगिक संस्कृतीचा प्रभाव आहे आणि हातात फोरजीचा मोबाइल घेऊन आपण तो अनुभवत आहोत. या नव्या लाटेत उत्पादक आणि उपभोक्ता यांचे संबंधच विचित्र होतील आणि नवा उत्भोक्ता – प्रोझ्युमर असा वर्ग निर्माण होईल, जुनी कुटुंबव्यवस्था लयास जाईल, एकलपालकत्व बळावेल, कार्पोरेट क्षेत्रांतील अधिकारांची श्रेणीरचना बदलेल, एवढेच नव्हे तर राष्ट्र आणि राज्य यांचे संबंध बदलतील, एकंदरच शासन, कुटुंब, उद्योग यांत विकेंद्रीकरण हा कळीचा शब्द बनेल, असे टॉफलर यांचे भाकीत होते. आणि म्हणूनच युरोपियन संघराज्य हे या काळास साजेसे नाही असे त्यांचे प्रतिपादन होते. ते ‘ब्रेग्झिट’ने खरे ठरविले. भारतातील आजचा वैचारिक गोंधळ हेही ‘थर्ड वेव्ह’चीच मांडणी अधोरेखित करीत आहे. निदान त्या गोंधळाची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तरी ‘थर्ड वेव्ह’ हे एक अत्यावश्यक वाचन आहे.

आज टॉफलर आपल्यात नाहीत. पण त्यांची ‘थर्ड वेव्ह’, त्यानंतर त्याच मालिकेतील ‘पॉवर शिफ्ट’ किंवा ‘थर्ड वेव्ह’चेच जोडपुस्तक म्हणता येईल असे २००६ मध्ये आलेले ‘रिव्हॉल्यूशनरी वेल्थ’ ही पुस्तके आपल्यासोबत आहेत. त्यांच्या लोलकातून भविष्याचा चेहरा कदाचित लख्ख दिसेल, कदाचित आज तो फसवाही वाटेल. पण या पुस्तकांचे, टॉफलर यांच्या विचारांचे काम एवढे कुडमुडे नाही. आजच्या वर्तमानातून उद्याचे बदलते प्रवाह कसे समजून घ्यावेत हे टॉफलर त्यातून दाखवून देत आहेत. त्यांनी ‘उद्या’ कसा पाहिला हे सांगत आहेत. बदलांना सामोरे जाण्यासाठी हे जाणून घेणे अत्यावश्यक असते. त्याबाबतीत अडाणी राहणे हे धोकादायकच. लोकसत्ता परिवारातर्फे टॉफलर यांना आदरांजली वाहताना, त्यांची पुस्तके बदलत्या काळातही कालबा होणार नाहीत याची आठवण देणे औचित्यपूर्ण ठरेल.